तडीपार करुनही तो बाईकचोर सुधारेना; अखेर करावी लागली येरवड्यात रवानगी
By विलास जळकोटकर | Updated: October 20, 2023 19:04 IST2023-10-20T19:04:13+5:302023-10-20T19:04:33+5:30
गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेऊन २०२१ मध्ये त्याला तडीपार करण्यात आले.

तडीपार करुनही तो बाईकचोर सुधारेना; अखेर करावी लागली येरवड्यात रवानगी
सोलापूर: घातक शस्त्राद्वारे लोकांमध्ये दहशत पसरवायची घरफोड्या, खंडणी, दुचाकी चोरी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या तेजसला सुधारण्यासाठी तडीपारची कारवाई करुनही त्याच्यात सुधारणा होत नसल्याने पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर एमपीएडी (स्थानबद्ध)चा आदेश बजावला. त्यानुसार शुक्रवारी तेजस धर्मपाल उर्फ धर्मप्पा कांबळे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. गेल्या काही वर्षापासून तेजस हा घातक शस्त्रांद्वारे दहशत माजवून बाईक चोरी, जबरी चोरी, घरफोडी व खंडणी सारखे गंभीर गुन्हे करत होता. त्याच्याविरोधात १५ गुन्हे पोलीस दप्तरी दाखल आहेत. यामुळे सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल दहशत निर्माण झाली होती.
दरम्यान त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेऊन २०२१ मध्ये त्याला तडीपार करण्यात आले. मात्र त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, सार्वजनिक हिताला बाधा आणणारी कृत्ये तो करीत राहिला. त्यामुळे त्याला स्थानबध्द करण्याचा आदेश पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिला. त्याप्रमाणे आदेशाची अंमलबजावणी करून त्याला येरवाडा कारागृहात पाठवण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त डॉ. दीपाली काळे, उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, राजकुमार वाघचवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउर्पाने विशेंद्रसिंग बायस, विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव व विशाल नवले यांनी पार पाडली.