मोठी बातमी; ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान सोलापुरात; नियोजनासाठी २७ तारखेला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 18:13 IST2022-04-18T18:13:03+5:302022-04-18T18:13:11+5:30
पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुलांचे ऑगस्टमध्ये वाटप होणार आहे.

मोठी बातमी; ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान सोलापुरात; नियोजनासाठी २७ तारखेला बैठक
सोलापूर : कुंभारीच्या माळरानावर साकारत असलेल्या रे नगर योजनेतील तीस हजार घरकुलांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुलांचे ऑगस्टमध्ये वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुल वाटप कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. यासाठी पंतप्रधान ९ ऑगस्टला सोलापुरात येण्याची शक्यता आहे.
याच्या नियोजनासाठी २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. या व्हिसीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत. रे नगर प्रकल्पाच्या प्रगतीबाबत पंतप्रधान स्वतः व्हिसीद्वारे घेणार आहेत. या व्हिसीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ सचिव, राज्याचे मुख्य सचिव तसेच माजी आमदार नरसय्या आडम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रे नगरच्या पायाभूत सुविधांसाठी तीनशे कोटींची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी देण्यात येणार आहे. रे नगरच्या अडचणींबाबत व्हिसीमध्ये चर्चा होईल. तसेच योजनेतील लाभार्थींना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेताना अडचणी येत आहेत. या अडचणींबाबतदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिसीच्या नियोजनासाठी तयारी सुरू आहे.