मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यात शॉर्टसर्किटने सौर ऊर्जा प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 17:44 IST2020-11-16T17:43:44+5:302020-11-16T17:44:14+5:30
कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या; आग नियंत्रणात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यात शॉर्टसर्किटने सौर ऊर्जा प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी
मंगळवेढा /मल्लिकार्जुन देशमुखे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निंबोणी येथील ३३ के.व्ही उपकेंद्रांत बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील प्रकल्पास सोमवारी दुपारी अचानक विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आगीने भीषण रूप घेतले आहे. साडेचार वाजता अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सोलर पाॅवर जनरेटींग सिस्टीम यांच्या अखत्यारीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजनेतून ६५७. २ KWP इतक्या क्षमतेचा महावितरण कंपनी च्या निंबोणी येथील शाखा कार्यालयाच्या शेजारी ३३ के.व्ही उपकेंद्राच्या बाजूला रिकाम्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात आला. या प्रकल्पात तयार होणारी वीज तिथेच ३३ KV उपकेंद्रांत पुरवठा केला जात आहे या प्रकल्पास आज दुपारी तीनच्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली आग विझविण्यासाठी महावितरण'च्या कार्यालयात आवश्यक तितक्या प्रमाणात अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नाही. शिवाय इतर ठिकाणी असलेली अग्नीश्यामक यंत्रणा उपलब्ध झाली नाही.
या कार्यालयात असलेल्या कर्मचाय्रातील बहुतांश कर्मचारी दिवाळी सुट्टीवर गेले असून उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना म्हणावे तितके यश आलेले नाही.
सौर प्रकल्पातील महत्त्वाची सामुग्री या आगीच्या भक्षस्थानी पडल्याने यात सौर प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असले तरी पंचनाम्यातून नेमके किती रूपयाचे नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे.