मोठी बातमी;  तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील ७८३ गावांनी मात्र कोरोनाला रोखले वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 04:10 PM2022-01-20T16:10:37+5:302022-01-20T16:10:43+5:30

कोरोना शिरतोय गावात, गावकरी मात्र बिनधास्त.

Big news; In the third wave, however, 783 villages in Solapur district blocked the corona at the gate |  मोठी बातमी;  तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील ७८३ गावांनी मात्र कोरोनाला रोखले वेशीवर

 मोठी बातमी;  तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील ७८३ गावांनी मात्र कोरोनाला रोखले वेशीवर

Next

सोलापूर: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. गावागावात रुग्ण आढळून येत असून, गावकरी मात्र बिनधास्त असल्याचे चित्र दिसत आहे. ७८३ गावांनी मात्र कोरोनाचा संसर्ग वेशीवरच थोपविण्यात आतापर्यंत यश मिळविले आहे. हे सातत्य रहावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘माझं गाव सुरक्षित’ हे अभियान राबविण्याची सूचना सरपंच व ग्रामसेवकांना दिली आहे.

डिसेंबरअखेर ग्रामीण भागात ८४ तर शहरात केवळ ४ रुग्ण ॲक्टिव्ह होते. पण नवीन वर्षात संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पंधरवड्यात रुग्णसंख्येचा आलेख २५ पटीने वाढल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात १ हजार ४५२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. १ हजार १९ ग्रामपंचायतीपैकी निम्म्या गावात कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असलेले अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यात संसर्ग पुन्हा वाढला आहे. सद्यस्थिती सर्वच तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधितांचे प्रमाण जास्त असलेले तरी लक्षणे तीव्र नसल्याने चिंता कमी आहे. लस घेतलेल्या रुग्णांना दुसऱ्यांदा बाधा दिसून आली तरी काहींना लक्षणे आहेत तर काहींना काहीच लक्षणे दिसत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने ज्याला त्रास त्याचीच चाचणी करण्यावर भर दिला आहे. लसीकरणाचा फायदा दिसून येत असल्याने अद्याप ज्यांनी डोस घेतलेला नाही त्यांचा शोध घेऊन लसीकरण पूर्ण करण्याकडे प्रशासनाचे उदिष्ट आहे. निर्बंध कमी असल्याने लोकांचा प्रवास, गर्दीत जाणे वाढले आहे. त्यामुळे संसर्ग वाढला आहे. लोकांनी स्वत:हून शिस्त पाळावी अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. पण गावकरी बिनधास्त असल्याने कोरोना गावागावात शिरकाव करीत असल्याचे चित्र आहे.

बार्शी, पंढरपूर पुन्हा नंबरवर

दुसऱ्या लाटेत बार्शी, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात संसर्ग अधिक होता. आता पुन्हा बार्शी व पंढरपूर तालुक्यात संसर्ग वाढल्याचे बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. बार्शीमध्ये ४४३ तर पंढरपूर तालुक्यात ४१८ रुग्ण बाधित आहेत. त्याखालोखाल माढा, माळशिरस, करमाळा तालुक्याचा नंबर लागत आहे. अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूर, सांगोला तालुक्यात रुग्णांचा आकडा दोन अंकी आहे.

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

 • अक्कलकोट:११४
 • बार्शी: १०२
 • करमाळा:९३
 • माढा:७२
 • माळशिरस:६४
 • मंगळवेढा:६०
 • मोहोळ:९५
 • उ. सोलापूर:३२
 • पंढरपूर:५८
 • सांगोला:७६
 • द. सोलापूर:३९

गाव करील ते...

पहिल्या लाटेत ३८ बाधित होते तर दुसऱ्या लाटेत दोन ज्येष्ठ मंडळींना फटका बसला, म्हणून आता आम्ही खबरदारी घेतोय. गाव शंभर टक्के लसीकरण केले आहे. गावकऱ्यांना बाहेर जाताना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. बाहेरून आलेल्यांसाठी जनजागृती सुरूच आहे.

श्रीशैल बनसोडे, सरपंच, गौडगाव

 

बाजारपेठेचे गाव आहे, पण आम्ही सुरुवातीपासून खबरदारी घेतली. पहिला व दुसऱ्या लाटेत गावात फारसा प्रभाव दिसू दिला नाही. सध्या एकालाही बाधा नाही. त्रिसूत्रीचे पालन कडकपणे करीत आहोत. लसीकरण शंभर टक्के होण्याच्या मार्गावर आहे.

रावसाहेब पाटील, सरपंच, कंदलगाव

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शंभर टक्के लसीकरणावर भर दिला आहे. मी सुरक्षित, माझे गाव सुरक्षित ही मोहीम हाती घेतली आहे. कोरोना वेशीवरच रोखण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांवर जबाबदारी दिली आहे. सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी

 

 

Web Title: Big news; In the third wave, however, 783 villages in Solapur district blocked the corona at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app