मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ गुरूवारी सोलापूर बंदची हाक; सकल मराठा समाज आक्रमक
By Appasaheb.patil | Updated: September 24, 2024 14:22 IST2024-09-24T14:21:22+5:302024-09-24T14:22:11+5:30
सकल मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, सगेसोयरेसह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या ८ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ गुरूवारी सोलापूर बंदची हाक; सकल मराठा समाज आक्रमक
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जीवाची पर्वा न करणारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन, पाठिंबा देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या बंदमध्ये शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, व्यापारपेठा, बाजारपेठां, दुकाने, खासगी वाहतूक सेवांचा सहभाग असणार आहे.
सकल मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, सगेसोयरेसह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या ८ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. परंतु शासनाने त्यांची दखल घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षांकडून मराठा व ओ.बी.सी. यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडवण्याचे कारस्थान सत्ताधारी करत आहेत.
याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरु करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेस माऊली पवार, राजन जाधव, विनोद भोसले, आप्पासाहेब सपाटे, महादेव गवळी, प्रकाश ननवरे, विलास लोकरे आदी उपस्थित होते.