मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात आढळले ५५२ क्षयरुग्ण; नव्या ८२ कुष्ठरोगींवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 14:44 IST2021-01-07T14:44:37+5:302021-01-07T14:44:48+5:30
क्षयरोगाच्या एकूण संशयित रुग्णांपैकी ४२ हजार ११५ संशयित रुग्णांचे थुंकी नमुने गोळा करण्यात आले.

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात आढळले ५५२ क्षयरुग्ण; नव्या ८२ कुष्ठरोगींवर उपचार
सोलापूर : जिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबरदरम्यान संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान राबविण्यात आले. अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३२ लाख ७९ हजार ९२९ नागरिकांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३१ डिसेंबर अखेर ३२ लाख ७९ हजार २५८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातून ५५२ क्षयरुग्ण आढळून आले.
क्षयरोगाच्या एकूण संशयित रुग्णांपैकी ४२ हजार ११५ संशयित रुग्णांचे थुंकी नमुने गोळा करण्यात आले. तसेच ३१ हजार ३२८ रुग्णांची क्ष-किरण तपासणी केली. या तपासणीत एकूण ५५२ क्षयरुग्ण आढळले. या सर्व क्षयरुग्णांना औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. या अभियानात कुष्ठरोगाचे ११ हजार ४२० संशयित आढळून आले असून सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ८२ नवीन कुष्ठरोगी सापडले तसेच या सर्वांवर औषधोपचार सुरू करण्यात आला आहे.
अभियानाकरिता जिल्ह्यात सर्वेक्षण पथकाची निर्मिती करण्यात आली होती. त्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. हे अभियान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.