महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान काही दिवसात होणार आहे, या आधीच सोलापूरात राजकीय वर्तुळात धक्कादायक हालचाली सुरू आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने अचानक भाजपामध्ये प्रवेश केला आहे, या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ९ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आज प्रचाराच्या रणधुमाळीत अचानक केलेल्या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ९ ड मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
या प्रभागामध्ये भाजपाचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती. आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराने भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे समीकरणे बदलली आहेत, भाजपाच्या उमेदवाराचे पारडे जड झाले असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत आता एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या गोटात घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.