भोंदूबाबा 'मनोहरमामा' ला पाच दिवसाची पोलिस कोठडी; बारामती न्यायालयाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 15:51 IST2021-09-11T15:50:28+5:302021-09-11T15:51:27+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

भोंदूबाबा 'मनोहरमामा' ला पाच दिवसाची पोलिस कोठडी; बारामती न्यायालयाचा निर्णय
करमाळा : कॅन्सरवर उपचार करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या मनोहरमामा तथा मनोहर भोसले याला आज बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांनी ही कोठडी सुनावली.
बारामती शहरातील कसबा येथील शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सर हा आजार झाला होता. आपण संत बाळूमामाचे अवतार असल्याचे सांगत मनोहर भोसले यांनी कॅन्सर बरा करण्याच्या बहाण्याने २ लाख ५१ हजार रुपये घेतले. याबद्दल शशिकांत खरात यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मनोहरमामासह ओंकार शिंदे आणि विशाल वाघमारे यांच्यावर फसवणूक आणि जादू टोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनोहरमामाचा शोध सुरु केला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकानेही मनोहरमामावर पाळत ठेवली होती. शुक्रवारी दुपारी मनोहरमामाला सातारा जिल्ह्यातील लोणंदनजीकच्या सालपे येथील एका फार्म हाऊसवरुन ताब्यात घेत अटक करण्यात आली.
आज सकाळी मनोहरमामाला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने मनोहरमामाला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. मनोहरमामा विरोधात करमाळा पोलिस ठायात ही महिला भक्तावर अत्याचाराचा गुहा दाखल झाला आहे.