७०० कारागिरांमुळे वाहन दुरुस्ती व्यवसाय टॉप गेअरवर, जिल्ह्यात १८ लाख वाहने
By दिपक दुपारगुडे | Updated: March 30, 2023 18:08 IST2023-03-30T18:03:22+5:302023-03-30T18:08:41+5:30
शहरात धावतात साडे आठरा लाखापेक्षा अधिक वाहन

७०० कारागिरांमुळे वाहन दुरुस्ती व्यवसाय टॉप गेअरवर, जिल्ह्यात १८ लाख वाहने
दीपक दुपारगुडे
सोलापूर : दुचाकी, स्कूटर, मोपेड, मोटार कार, जीप, टॅक्सी, ऑटोरिक्षा, मिनी बस, स्कूल बस, खासगी सेवा देणारी वाहने, रुग्णवाहिका, ट्रॅक, टॅंकर, तीन-चारचाकी मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांच्या खरेदीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाहन दुरुस्ती व्यवसाय व देखभाल उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार दडलेला आहे. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून त्याच प्रमाण गॅरेज वा ऑटोमोबाईल वा स्पेअर पार्टसच्या दुकानसमोर गॅरेज थाटण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहरामध्ये सातशे पेक्षा अधिक वाहन दुरुस्ती कारागीर असल्यामुळे वाहन बिघाड झाल्यास अधिक वेळ मेकॅनिकची वाट पहाव लगत नाही, त्यामुळं शहरातील वाहन दुरुस्ती व्यवसाय सध्या टॉप गेअरवर आहे.
शहरात रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पदपथांवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दुचाकी, चारचाकी गाड्या दुरुस्तीसाठी करताना दिसून येतात. वाहनदुरुस्तीचे कोणतेही प्रशिक्षण नसतानाही अनेकांनी हे ज्ञान, कला आत्मसात केली ती गॅरेजमध्ये काम करून, निरीक्षण करूनच. सध्याही गॅरेजचे काम अशाच प्रकारे शिकण्याकडे कल मोठ्या प्रमाणात आहे. एक गॅरेजच्या माध्यमातून अनेकांना काम शिकण्याची व नंतर स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळत आहे.
---
जिल्ह्यात वाढतेय वाहनांची संख्या
फेब्रुवारी २०२३ च्या आकडेवाडीनुसार सोलापूर आणि अकलूज उपप्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदीनुसार जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल १८ लाख ३० हजार आहे. दरमहा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जवळपास आठ हजारांहून अधिक वाहनांची नोंद होते. त्यात दुचाकी व चारचाकी, रिक्षा आणि कार ही वाहने सर्वाधिक आहेत.
---
शहरात ७०० पेक्षा अधिक कारागीर
गेल्या काही वर्षांत ऑटोमोबाईल्स वा स्पेअर पार्टचे दुकान सुरू करून त्यासमोर एक-दोन मॅकेनिकद्वारे वाहनदुरुस्तीची कामे करण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे, शहरात ७०० पेक्षा अधिक मेकॅनिक कार्य करत आहे.