लाच घेणारा शिक्षक अटकेत
By Admin | Updated: July 12, 2014 00:35 IST2014-07-12T00:35:17+5:302014-07-12T00:35:17+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

लाच घेणारा शिक्षक अटकेत
सोलापूर : शाळेची देखभाल करण्यासाठी वर्षातील एका महिन्याच्या पगाराची रक्कम (१५ हजार रुपये) स्वीकारताना शुक्रवार पेठेतील मातोश्री मालनबाई आप्पाराव कस्तुरे हायस्कूलमधील सहशिक्षक दयानंद हुवण्णा तीर्थकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. तीर्थकर याने एका महिला शिक्षिकाकडून लाच घेताना ही कारवाई करण्यात आली. दरमहा शाळेच्या डागडुजीसाठी शाळेतील प्रत्येक शिक्षकाकडून काही रक्कम घेतली जाते. तक्रारदार यांनी २०१३-१४ मधील रक्कम टप्प्याटप्प्याने ४० हजार रुपये जमा केली. त्यानंतरही संस्थेचे सचिव भारत आप्पाराव कस्तुरे यांच्या सांगण्यावरून तीर्थकर यांनी पूर्ण पगाराच्या रकमेची मागणी केली. दरम्यान, त्या महिला शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. पथकाने सापळा लावला असता तीर्थकर हा लाच घेताना रंगेहाथ सापडला. तीर्थकर याच्यासह संस्थेचे सचिव भारत कस्तुरे या दोघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला.