हिंदू लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:34 IST2018-04-27T16:34:07+5:302018-04-27T16:34:07+5:30

हिंदू लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री
सोलापूर : महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायतांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ओबीसी आयोगाकडे प्रयत्न करण्यात येईल तसेच मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे दिले.
होटगी मठाच्या वतीने येथील वीरतपसवी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १००८ शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी व काशी, श्रीशैल, उज्जैन पीठाचे जगदगुरू उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख यांच्या मागणीवरून फडणवीस म्हणाले की, राज्यातील हिंदु लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यातील अडचण दूर करण्यासाठी याबाबतचा विषय ओबीसी आयोगाकडे पाठविण्यात येईल. लिंगायत समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी सरकारने जागा दिलीच आहे. या स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. याचवेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे भाषणे झाली़