टेरेसच्या टाकीत पाणी का सोडले नाही, विचारताच वॉचमनसह दोघांनी घरमालकाचा हात केला फ्रॅक्चर
By रवींद्र देशमुख | Updated: March 23, 2023 17:07 IST2023-03-23T17:06:21+5:302023-03-23T17:07:19+5:30
मंगळवारी सकाळी फिर्यादी हे मुलाला कॉलेजला सोडण्यासाठी जात असताना त्यांना वाॅचमन महेबूब दिसला.

टेरेसच्या टाकीत पाणी का सोडले नाही, विचारताच वॉचमनसह दोघांनी घरमालकाचा हात केला फ्रॅक्चर
सोलापूर : टेरेसवरील टाकीमध्ये पाणी का सोडत नाही, असे विचारल्याच्या कारणावरून सोसायटीचा वॉचमन व तेथेच व्यवसाय करणाऱ्या टेलरने घरमालक अस्लम फरीदसाब नरसापुरे (वय ४४, रा. सेंट्रल आयकॉन अपार्टमेंट, शनिवार पेठ ) यांना मारहाण करून हाड फॅक्चर केले. याप्रकरणी नरसापूरे यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी सकाळी फिर्यादी हे मुलाला कॉलेजला सोडण्यासाठी जात असताना त्यांना वाॅचमन महेबूब दिसला. नरसापूरे यांनी वॉचमनला टेरेसवरील टाकीमध्ये पाणी का सोडत नाही, असे विचारले तेव्हा महेबूब याने मी पाणी कुठून आणणार, मला ते सांगायचे नाही म्हणत
फिर्यादींना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यावेळी टेलर काम करणारा दुसरा आरोपी मोहसीन सय्यद याने फिर्यादी अस्लम नरसापुरे यांना तू वॉचमनशी का वाद घालतोस, असे म्हणत दुकानातून काठी घेऊन येऊन फिर्यादीच्या हातावर रट्टा मारला. यात त्याचे हाताचे हाड फ्रॅक्चर झाले. तसेच हे भांडण सोडवत असताना नरसापुरे यांच्या मुलालाही काठीने मारहाण करून जखमी केले.फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून सोसायटीचा वॉचमन महेबूब व मोहसीन सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.