ऑक्टोबर अखेर सर्व पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळेल, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: October 15, 2025 17:45 IST2025-10-15T17:34:07+5:302025-10-15T17:45:23+5:30
Solapur News: दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. काही पूरग्रस्तांना दिवाळीनंतर नुकसान भरपाई मिळेल. ऑक्टोबर अखेर सर्व बाधितांच्या खात्यावर नुकसान निधी जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापुरात दिली.

ऑक्टोबर अखेर सर्व पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळेल, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर - दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. काही पूरग्रस्तांना दिवाळीनंतर नुकसान भरपाई मिळेल. ऑक्टोबर अखेर सर्व बाधितांच्या खात्यावर नुकसान निधी जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापुरात दिली.
सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. या प्रसंगी त्यांच्या हस्ते पूरग्रस्तांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. स्टार एअरकडून ही विमानसेवा सुरू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात आला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदतनिधी देण्यासंदर्भात वक्तव्य केले. तसेच या प्रसंगी येथील बालाजी अमाईन्स कंपनीने सीएम फंडसाठी १ कोटीचा, तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांनी हा धनादेश स्वीकारला.
बोइंग विमानांसाठी काही निर्णय घेणार आहोत
भविष्यात सोलापुरात बोइंग विमाने उतरण्यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. होटगी रोड विमानतळाचे विस्तारीकरण तसेच त्या ठिकाणी नाइट लँडिंग सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच बोरामणी विमानतळासाठी काही अडचणी आहेत. काही प्रस्ताव रिजेक्ट झाले आहेत. कठीण असले तरी त्यातून मार्ग काढू. बोरामणी विमानतळासंदर्भात भविष्यात काही निर्णय घेणार आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमस्थळी तसेच त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केले.
माझ्या बहिणीला न्याय द्या
पालकमंत्री जयकुमार गोरे हे आपल्या भाषणात पूरग्रस्त बहिणींना दिवाळी किट देण्यासंदर्भात माहिती देत होते, याच वेळी पवन मारुती जिंदम नामक एका युवकाने हातात एक कागद घेऊन माझ्या बहिणीला न्याय द्या..अशी हाक मारली. जोरजोरात ओरडू लागला. पोलिसांनी त्यांना रोखले. तुमच्याही बहिणीला मुख्यमंत्री नक्की न्याय देतील, असे वक्तव्य पालकमंत्र्यांनी व्यासपीठावरून केले. जिंदम यांच्या बहिणीचा १५ ऑगस्ट रोजी संशयास्पद मृत्यू झाला असून एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकारी चौकशी करेनात, अशी त्याची तक्रार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पोलिस आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिल्याची माहिती पोलिसांनी लोकमतला दिली.