अकलूजचा सराईत गुन्हेगार निखिल शिरसटसह ५ जण सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार
By विलास जळकोटकर | Updated: May 31, 2023 19:12 IST2023-05-31T19:12:43+5:302023-05-31T19:12:59+5:30
शिरसटसह पाचजणांविरुद्ध एक वर्षासाठी हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

अकलूजचा सराईत गुन्हेगार निखिल शिरसटसह ५ जण सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार
सोलापूर : लोकांमध्ये दहशत निर्माण करून शांततेला गालबोट लावणाऱ्या अकलूजच्या निखिल शिरसटसह त्याच्या पाच साथीदारांना एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी बुधवारी बजावला. सदर आरोपीने माळशिरस तालुक्यात तसेच आजूबाजूच्या परिसरात टोळी निर्माण करून स्वतः व टोळीच्या साथीदारामार्फत गंभीर गुन्हे करून लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. अकलूज पोलिस ठाण्यात निखिल शिरसट व त्याच्या साथीदाराविरुद्ध मालमत्ता, घातक हत्याराचा वापर करून जखमी करणे, मालमत्तेचे नुकसान करून हल्ला करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे रेकाॅर्डवर आहेत. त्यांच्यावर कारवाई करूनही सुधारणा न झाल्यामुळे शिरसटसह पाचजणांविरुद्ध एक वर्षासाठी हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
हा आदेश पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बजावल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुहास जगताप, गायकवाड, सहायक फौजदार जाधवर, अनिस शेख, बकाल, पठाण यांनी ही कारवाई मोहीम राबवली.
या सहाजणांविरुद्ध आदेश
हद्दपारीचा आदेश बजावलेल्यांमध्ये टोळी प्रमुख निखिल नवनाथ शिरसट, शंकर अशोक काळे, माउली ऊर्फ ज्ञानेश्वर अशोक काळे, रोहिदास सुरेश काळे, आकाश रमेश धोत्रे, राजू ज्ञानेश्वर काळे (सर्व रा. व्यंकटनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.