Anjali Krishna IPS Ajit Pawar: 'तुम्हारी इतनी हिम्मत, मैं अॅक्शन लुंगा', असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना दम दिला आणि कारवाई थांबवली. अवैध उत्खनन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कॉल केल्यानंतर अजित पवारांनी पोलीस उपअधीक्षक आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यापासून रोखले. पण, ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी हे केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाळा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन केले जात होते. ते रोखण्यासाठी महसूलचे अधिकारी गेले. पण, त्यांना गावकऱ्यांनी काठ्या दाखवत रोखले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा या पथकासह घटनास्थळी गेल्या होत्या. त्यांनाही अजित पवारांनी कॉलवरून कारवाई न करण्यास सांगितले.
१५ ते २० जणांवर गुन्हा दाखल
अजित पवारांना कॉल करून होत असलेली कारवाई रोखणारे अडचणीत आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
अजित पवारांचा अंजली कृष्णा यांच्यासोबतच्या संवादाचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अजित पवारांनी अवैध कामाला पाठिंबा देत अधिकाऱ्यांना कारवाई करण्यापासून रोखल्याचे सांगत टीका होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांनी महिला पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांची माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.