Agriculture is better than job; The income of two and a half million rupees | नोकरीपेक्षा शेती बरी; अडीच एकराच्या खरबुजातून साडेसहा लाखांचे उत्पन्न
नोकरीपेक्षा शेती बरी; अडीच एकराच्या खरबुजातून साडेसहा लाखांचे उत्पन्न

ठळक मुद्देशेतीपेक्षा नोकरी बरी म्हणून मंगेशने २०११ साली एका कंपनीत फिल्डवर वसुलीचे काम करायचे ठरवलेसहा वर्षे नोकरी केल्यानंतर २०१६ मध्ये ती कंपनी सोडून त्यांनी दुसरी कंपनी जॉईन केलीएका फळाचे वजन एक किलो ते दीड किलोपर्यंत भरले. अडीच रुपयांच्या एका रोपाला जवळपास चाळीस रुपयांचे उत्पन्न मिळाले

अशोक कांबळे

मोहोळ : नोकरीपेक्षा आपल्या बापजाद्यांची पारंपरिक शेतीच बरी, म्हणून शेती करण्यासाठी नोकरी सोडली. अडीच एकर दिसायला लहान, पण खायला साखरेसारखे गोड लागणारे खरबुजाचे पीक घेऊन चार महिन्यात साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील युवा शेतकरी मंगेश महादेव होनमाने यांनी.

महादेव होनमाने हे उसाचे पीक घेतात. एकुलता एक असणाºया मंगेशने सोलापूरच्या वसुंधरा कॉलेजमध्ये एम. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. शाळा शिकून शेती कशाला करायची? शेतीपेक्षा नोकरी बरी म्हणून मंगेशने २०११ साली एका कंपनीत फिल्डवर वसुलीचे काम करायचे ठरवले. त्यात महिन्याकाठी बारा हजार रुपये पगार मिळायचा. सहा वर्षे नोकरी केल्यानंतर २०१६ मध्ये ती कंपनी सोडून त्यांनी दुसरी कंपनी जॉईन केली.

त्यानंतर त्यांना नोकरी नकोशी वाटू लागली. अशात फिल्डवर काम करताना त्यांना अनेक शेतकºयांचे सक्सेस पासवर्ड दिसले. त्यातून प्रेरणा घेऊन स्वत:ही शेती करण्याचा निर्णय घेऊन ते काळ्या मातीत रमले आणि यश मिळविले. प्रारंभी कोन्हेरी येथील देविदास देवकते व गावातील मित्र कैलास हराळे यांचे मार्गदर्शन घेऊन मंगेशने उसाला अठरा महिने वेळ घालवण्यापेक्षा कमी वेळेत जादा उत्पन्न व जादा पैसे देणारे पीक म्हणून खरबुजाची निवड केली आणि जानेवारी २०१९ च्या दरम्यान अडीच एकर शेतीची मशागत केली. 

त्यात शेणखत टाकून मल्चिंग पेपर अंथरून अडीच रुपयांना एक रोप याप्रमाणे एक हजार खरबुजाची रोपे लावली. त्याचे व्यवस्थित संगोपन केले आणि अवघ्या चार महिन्यातच त्यांना अडीच एकरात साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मंगेशने स्वत: वाशीच्या मार्केटला जाऊन ३० रुपये किलोप्रमाणे माल विकला. या कामात त्यांना आई-वडील व पत्नीचे मोठे प्रोत्साहन व सहकार्य मिळाले. 

उसापेक्षाही अधिक फायदा
एका फळाचे वजन एक किलो ते दीड किलोपर्यंत भरले. अडीच रुपयांच्या एका रोपाला जवळपास चाळीस रुपयांचे उत्पन्न मिळाले. अठरा महिने वडील उसाच्या शेतात राबल्यावर पाच एकरात चार लाख मिळायचे. परंतु नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खरबूज घेतल्यामुळे चार महिन्यात साडेसहा लाख रुपये मिळाले.


Web Title: Agriculture is better than job; The income of two and a half million rupees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.