उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल, सोलापूर महापालिकेची कारवाई
By Appasaheb.patil | Updated: December 28, 2022 16:31 IST2022-12-28T16:29:48+5:302022-12-28T16:31:28+5:30
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास त्याचबरोबर रस्त्यावरही कचरा दिसून आल्यास त्या परिसरातील दुकानदारांवर व नागरिकांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांविरोधात ही दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल, सोलापूर महापालिकेची कारवाई
सोलापूर: शहरात सार्वजनिक ठिकाणी अथवा दुकानांसमोर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्याविरोधात महापालिका कचरा व्यवस्थापन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या आठवड्यात महापालिकेच्या विविध झोनमधील आरोग्य निरीक्षकांनी १ लाख ४१ हजार रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास त्याचबरोबर रस्त्यावरही कचरा दिसून आल्यास त्या परिसरातील दुकानदारांवर व नागरिकांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांविरोधात ही दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. १५ ते २२ डिसेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घाेलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. झोन क्रमांक १ - ३६ हजार ४५०, झोन क्रमांक २ - १७ हजार ४००, झोन क्रमांक ३ - १२ हजार ४८०, झोन क्रमांक ४ - १० हजार ४००, झोन क्रमांक ५ - २६ हजार ४०८, झोन क्रमांक ६ - ८ हजार ६९२, झोन क्रमांक ७ - १२ हजार ७०२, झोन क्रमांक ८ ने १६ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे.
रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई -
दुकानदार अथवा कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शिवाय प्लास्टिकचा वापर केल्यास संबंधितांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी सांगितले.