काळभैरवनाथचे दर्शन घेऊन निघालेल्या फर्निचर व्यवसायिकाचा सोलापुरात अपघाती मृत्यू
By काशिनाथ वाघमारे | Updated: April 8, 2024 15:42 IST2024-04-08T15:41:13+5:302024-04-08T15:42:37+5:30
कृष्णा प्रल्हाद सुतार असे अपघातात मरण पावलेल्या फर्निचर व्यवसायिकाचे नाव

काळभैरवनाथचे दर्शन घेऊन निघालेल्या फर्निचर व्यवसायिकाचा सोलापुरात अपघाती मृत्यू
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: परांडा तालुक्यात सोनारी येथील काळभैरवनाथ देवाचे दर्शन करून घरी दुचाकीवरून येत असताना लव्हे (ता.माढा) शिवारात अनोळखी वाहनाच्या धडकेने माढ्यातील फर्निचर व्यवसायिकाचा मृत्यू झाला. कृष्णा प्रल्हाद सुतार (वय ५७, रा. माढा) असे अपघातात मरण पावलेल्या फर्निचर व्यवसायिकाचे नाव असून हा अपघात ७ एप्रिल रोजी रात्री १०.१० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत नामदेव जालिंदर सुतार (रा.सापटणे भोसे ता.माढा) यांनी फिर्याद दिली असून अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मयत झालेले कृष्णा सुतार हे सोनारी येथे काळभैरवनाथ देवाचे दर्शन करून माघारी मोटरसायकल (एम.एच. ४५ / वाय. ८२२३) वरून माढ्याकडे येत होते. परांडा-कुर्डूवाडी रस्त्यावरून येत असताना लव्हे शिवारातील मिलिंद गायकवाड यांच्या शेताजवळ रस्त्यावर त्यांना समोरून येणाऱ्या एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यास जबर मार लागून जखमी झाले. त्यांची मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला पडली. जखमी अवस्थेत त्यांना कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे आहेत.