सोलापूर जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण घटले; परिवहन आयुक्तांची माहिती
By Appasaheb.patil | Updated: March 19, 2023 17:33 IST2023-03-19T17:33:32+5:302023-03-19T17:33:48+5:30
सध्या सोलापूर जिल्हा परिसरातून महत्वाच्या शहरांना जोडणारे सर्व रस्ते चांगले झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण घटले; परिवहन आयुक्तांची माहिती
सोलापूर : दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारीचा आलेख वाढलेलाच दिसून येतो. मात्र मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील अपघातांची संख्या घटली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या विशेष उपाययोजनेमुळे अपघातांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचा विश्वास परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी व्यक्त केला.
सध्या सोलापूर जिल्हा परिसरातून महत्वाच्या शहरांना जोडणारे सर्व रस्ते चांगले झाले आहेत. त्या चांगल्या रस्त्यांमुळे वाहने वेगात जात असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. याशिवाय वाहतूक नियमांचे पालन न केल्यानेही अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष उपाययोजना सुरू करण्यास सुरूवात केल्याने अपघातांची संख्या घटल्याचे परिवहन आयुक्तांनी सांगितले. मागील दोन महिन्यात रस्ते अपघाताच्या प्रमाणात ३ टक्क्यांनी घट झाल्याची माहितीही परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी दिली. राज्यात पुणे, नगर, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यामध्ये अपघाताचे प्रमाण जास्त आहे. यामुळे ज्या जिल्ह्यात अपघात जास्त आहेत तेथे उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे मागील दोन महिन्यात अपघातांची टक्केवारी कमी झाली आहे.