सहकार शिरोमणी कारखान्याच्या मतमोजणीवेळी अभिजीत पाटलांची गाडी फोडली; एक कार्यकर्ताही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 14:33 IST2023-06-18T14:31:15+5:302023-06-18T14:33:17+5:30
यात एक कार्यकर्ता जखमीही झाला आहे.

सहकार शिरोमणी कारखान्याच्या मतमोजणीवेळी अभिजीत पाटलांची गाडी फोडली; एक कार्यकर्ताही जखमी
मोहन डावरे -
पंढरपूर : सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मतमोजणीच्या ठिकाणी सत्ताधारी कल्याणराव काळे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडली. यात एक कार्यकर्ता जखमीही झाला आहे.
सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मतमोजणीला रविवारी सकाळी सुरुवात झाली. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सत्ताधारी कल्याणराव काळे गटाने मोठी आघाडी घेतली. विजयाची खात्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. मतमोजणीच्या ठिकाणी विरोधी गटाचे अभिजीत पाटील यांची गाडी थांबली होती. विजयाचा जल्लोष करताना काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील यांच्या गाडीवर गुलाल टाकत घोषणाबाजी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अभिजीत पाटील गटाचे किरण घाडगे या कार्यकर्त्याच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पंढरपूर रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.
यानंतर अभिजित पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिसांकडे दगडफेक करणाऱ्या ३०७ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या दगडफेकीच्या प्रकारामुळे पंढरपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.