पंढरपूर शहरात एबीसीडी पॅटर्न; एक दिवसाआड सुरू राहणार दुकाने...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 14:04 IST2020-05-18T14:01:36+5:302020-05-18T14:04:41+5:30
पंढरपूर नगरपालिकेचा निर्णय; आजपासूनच अंमलबजावणी सुरू

पंढरपूर शहरात एबीसीडी पॅटर्न; एक दिवसाआड सुरू राहणार दुकाने...!
पंढरपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या सूचनांनुसार पंढरपूर शहरातील व्यापाºयांच्या विविध असोसिएशनचे झालेल्या चर्चेनंतर पंढरपूर शहरातील दुकाने एबीसीडी पॅटर्न प्रमाणे आठवड्यातील तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २०५ अन्वये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार सदरचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ए व सी अक्षर टाकलेली टाकलेली दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार तर बी डी अक्षराची दुकाने मंगळवार, गुरुवार व शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
अत्यावश्यक सेवांमधील दूध, भाजीपाला, किराणा दुकान, शेती विषयक दुकाने, मिठाई दुकान व बेकरी इस्त्री दुकाने, महा-ई-सेवा, चिरमुरे दुकाने, झेरॉक्स दररोज सकाळी सात ते तीन पर्यंत सुरू राहणार आहेत.
दुकानदारांनी ग्राहकांमध्ये १ मीटर अंतर ठेवावे, त्यासाठी आॅयल पेन्ट ने मार्किंग करावे. आपले दुकान कोणत्या दिवशी सुरू राहणार आहे त्याचे फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावावेत, त्याचबरोबर साबणाने हात धुण्याची व्यवस्था करावी. तोंडाला मास्क लावणे बंधनकारक राहणार असून तसे न केल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारला जाईल. सार्वजनिक ठिकाणी थंकल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. लॉकडाऊनध्ये नियमाचे पालन न केल्यास पाच हजार रुपयांचा दंड दुकानदारांकडून आकारण्यात येणार आहे. वय वर्ष १० पर्यंतची मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी येण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली असल्याचे साधना भोसले यांनी सांगितले.