सोलापुरात झोपेतच हरवला तरुणाचा श्वास; आईनं उठवण्याचा प्रयत्न केला तो उठलाच नाही
By विलास जळकोटकर | Updated: January 17, 2024 18:57 IST2024-01-17T18:57:13+5:302024-01-17T18:57:25+5:30
तरुण आपल्या आईसह नातलगांसमवेत संजय गांधी नगर झोपडपट्टीत विरेश अशोक अलवीर यांच्या घरी भाडयाने राहत होता.

सोलापुरात झोपेतच हरवला तरुणाचा श्वास; आईनं उठवण्याचा प्रयत्न केला तो उठलाच नाही
सोलापूर : नेहमीप्रमाणे नित्यक्रम आटोपून तो तरुण घरी झोपला. चारच्या सुमारास त्याला आईनं उठवण्याचा प्रयत्न केला मात्र उठलाच नाही. बेशुद्धावस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात नेले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. झोपेतच त्याचा श्वास हरवला. राजेश सूर्यकांत लोणारे (वय- ३५, रा. संजयगांधी नगर झोपडपट्टी नं. २, विजापूर रोड सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.
यातील तरुण आपल्या आईसह नातलगांसमवेत संजय गांधी नगर झोपडपट्टीत विरेश अशोक अलवीर यांच्या घरी भाडयाने राहत होता. बुधवारी पहाटे चार च्या सुमारास तो राहत्या घरी झोपला होता. आई ने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठत नसल्याने ती घाबरुन गेली. आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. विजापूर नाका पोलिसांना खबर दिली. सहा. फौजदार एम. जी. शेख यांनी त्याल बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णायात नेले. येथे डॉक्टरांनी त्याची उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवल्याचे घोषित केले.