एकच मिशन..जुनी पेन्शन; सोलापूर महापालिकेचे शिक्षकही १४ मार्चपासून संपावर
By Appasaheb.patil | Updated: March 11, 2023 15:48 IST2023-03-11T15:47:52+5:302023-03-11T15:48:37+5:30
राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू होण्याकरिता १४ मार्च २०२३ पासून राज्यभर बेमुदत संपावर जाणार आहेत.

एकच मिशन..जुनी पेन्शन; सोलापूर महापालिकेचे शिक्षकही १४ मार्चपासून संपावर
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : राज्यात १४ मार्चच्या राज्यव्यापी संपामध्ये सोलापूर महापालिका शाळांमधील शिक्षकही सहभागी होणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी हनुमंत जाधवर यांना देण्यात आले.
राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू होण्याकरिता १४ मार्च २०२३ पासून राज्यभर बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामध्ये महानगरपालिका शाळेतील कार्यरत असणारे मराठी, उर्दू माध्यम कन्नड, तेलगू माध्यमाचे सर्व शिक्षक सहभागी होणार आहेत. आज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षण संघटनेच्या वतीने तसे निवेदन प्रशासनाधिकारी हनुमंत जाधवर यांना देण्यात आले.
महाराष्ट्र सर्वत्र जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू असताना कालच महाराष्ट्राचे अर्थसंकल्प जाहीर झाला. त्या अर्थसंकल्पामध्ये जुन्या पेन्शनचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. ही बाब खूप गंभीर आहे. त्यामुळे या संपाची हाक देण्यात आले आहे. स्वतःच्या हक्काच्या पेन्शनसाठी सर्व शिक्षकांनी या संपात सहभागी व्हावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे महापालिका शाखा अध्यक्ष नागेश गोसावी यांनी केले आहे. निवेदन देतेवेळी अध्यक्ष नागेश गोसावी, सचिव अमोल भोसले, उपाध्यक्ष अझर पंजेवाले, सह सरचिटणीस कल्लप्पा कुंभार, प्रसन्न निकंबे, विठ्ठल वाघमोडे, संतोष सुतार, किरण शेळगे, केशव गलगली, बसवराज माळी आदी शिक्षक उपस्थित होते.