पाण्याचा टँकर विकत घेऊन केळीचा प्लॉट जगविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड
By दिपक दुपारगुडे | Updated: March 17, 2024 19:18 IST2024-03-17T19:17:53+5:302024-03-17T19:18:26+5:30
शेतकरी टँकरने पाणी आणून फळबागा वाचवण्यासाठी धडपडत करू लागले आहेत.

पाण्याचा टँकर विकत घेऊन केळीचा प्लॉट जगविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड
सोलापूर: ऐन उन्हाळ्यात विहिर, बोअरची पाणीपातळी खोलवर गेल्याने निराश न होता वाकी - शिवणे (ता. सांगोला) येथील शेतकऱ्याने पाणीटंचाईवर मात करून टँकरमधील पाणी सायपन पध्दतीने केळीला घालून एक एकर केळीची बाग जगविण्याची किमया साधली आहे. चालू वर्षी सांगोला तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे ऐन उन्हाळ्यात विहिरी, बोअरची पाणीपातळी खोलवर गेल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाचे पाणी सुटले असले तरी लगेचच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचेल, असे काही नाही. त्यामुळे शेतकरी टँकरने पाणी आणून फळबागा वाचवण्यासाठी धडपडत करू लागले आहेत.
वाकी शिवणे येथील दिगंबर होवाळ या शेतकऱ्याने दीड महिन्यापूर्वी एक एकर केळीची लागवड केली. केळी लागवडीसाठी शेतीची मशागत, रोपे, खते, मजुरी असा आतापर्यंत सुमारे ८० हजार रुपये खर्च झाला. केळीच्या खुटाणे चांगले बाळसे धरले असताना त्यांच्या विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने उन्हाळ्यात त्यांच्यापुढे संकट निर्माण झाले आहे. मुळातच केळीला पाणी जास्त लागते. त्यामुळे त्यांनी बोअर घेतला. पण, त्यास पाणी लागले नसल्याने खर्च वाया गेला म्हणून दीड हजार रुपयांप्रमाणे दोन टँकर पाणी एक दिवसाआड घेऊन केळीचा प्लॉट जगविण्यासाठी दिगंबर होवाळ यांची धडपड सुरू आहे.