ऊस बिल थकवल्याप्रकरणी माजी आमदार पुत्रासह मकाई कारखान्याच्या १७ संचालकांवर गुन्हा दाखल
By दिपक दुपारगुडे | Updated: April 11, 2024 18:59 IST2024-04-11T18:58:55+5:302024-04-11T18:59:19+5:30
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलाची वारंवार मागणी करूनही बिल न मिळाल्यामुळे आळजापूर येथील समाधान शिवदास रणसिंग या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ॲड. अनिल पुंजाबा कांबळे यांच्यामार्फत करमाळा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.

ऊस बिल थकवल्याप्रकरणी माजी आमदार पुत्रासह मकाई कारखान्याच्या १७ संचालकांवर गुन्हा दाखल
सोलापूर : ऊस बिल थकवल्याप्रकरणी करमाळा न्यायालयाच्या आदेशानुसार मकाई कारखान्याचे तत्कालीन चेअरमन तथा माजी आमदार पुत्र दिग्विजय बागल यांच्यासह १७ संचालकांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलाची वारंवार मागणी करूनही बिल न मिळाल्यामुळे आळजापूर येथील समाधान शिवदास रणसिंग या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ॲड. अनिल पुंजाबा कांबळे यांच्यामार्फत करमाळा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. यानंतर न्यायाधीश बी. ए. भोसले यांनी गुरुवार दि. ४ रोजी मकाईच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार करमाळा पोलिसांनी मकाई सहकारी साखर लि. च्या तत्कालीन संचालक मंडळातील १६ संचालक आणि तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक यांच्यासह एकूण १७ जणांवर ऊस नियंत्रण आदेश १९६६ कलम-३ आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७ अन्वये, तसेच आयपीसी कलम ४२० व ४०६ सह कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे पुढील तपास करीत आहेत.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा...
दिग्विजय दिगंबरराव बागल, उत्तम विठ्ठल पांढरे, महादेव निवृत्ती गुंजाळ, नंदकिशोर विष्णुपंत भोसले, गोकुळ बाबुराव नलवडे, बाळासाहेब उत्तम सरडे, महादेव त्रिबंक सरडे, सुनिल दिंगबर शिंदे, रामचंद्र दगडु हाके, धर्मराज पंढरीनाथ नाळे, नितीन रामदास राख, रंजना बापु कदम, उमा सुनिल फरतडे, राणी सुनिल लोखंडे, संतोष साहेबराव पाटील, दत्तात्रय म्हाळु गायकवाड, प्र. कार्यकारी संचालक हरिशचंद्र प्रकाश खाटमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.