धक्कादायक; अकलूज शहरात कारचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: June 13, 2024 16:48 IST2024-06-13T16:47:25+5:302024-06-13T16:48:14+5:30
वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाले.

धक्कादायक; अकलूज शहरात कारचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू
अकलूज : वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाले. ही घटना अकलूज शहरातील महर्षि चौक ते गिरझणी चौकादरम्यान घडली. याबाबतची माहिती गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांनी माध्यमांना दिली.
शुभम बाळू चव्हाण (वय २३), यश नवनाथ शिंदे (वय २०, दोघे रा.वेळापूर), राहुल बापूसाहेब कोळेकर (वय २४, रा.उघडेवाडी) व समाधान बुवा सरतापे (वय २३, रा.खुडुस ता.माळशिरस) हे चौघे मित्र बुधवारी मध्यरात्री चाकी गाडीत महर्षि चौकातून जयसिंह चौकाकडे वेगाने निघाले होते. त्यावेळी वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने अनियंत्रित झालेली गाडी एम.एच.४५ एन.०००८ ही रस्त्यालगत असणाऱ्या दोन झाडांना धडकली.
रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या मैलाच्या दगडाला धडकून गाडी उलट्या दिशेला फिरली. मधल्या सिटावर बसलेल्या राहुल कोळेकर याच्या डोक्याचा अर्धा भाग तुटुन रस्त्यावर पडला होता, तर समाधानच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. शुभम चव्हाण व यश शिंदे हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद अकलूज पोलिस ठाण्यात झाली आहे.