मोठी बातमी; सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस १६ सप्टेंबरपर्यंत बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 16:07 IST2021-09-01T16:07:00+5:302021-09-01T16:07:04+5:30
रेल्वे प्रशासन - पावसामुळे काम करण्यास येतेय अडचण

मोठी बातमी; सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस १६ सप्टेंबरपर्यंत बंदच
सोलापूर - भाळवणी-भिगवन दरम्यान दुहेरीकरणाचे काम मुदतीत पूर्ण झाले नाही. ते अद्याप अपूर्णच असून काम पूर्ण होण्यासाठी अद्याप १५ दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या हक्काची असलेली सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस आता १६ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने बुधवारी घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सध्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विद्युतीकरणाचे कामही पूर्णत्वास येत आहे. रेल्वे प्रशासनाने भाळवणी ते भिगवण दरम्यान ८ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम मागील महिन्यात हाती घेतले होते. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत ब्लॉक घेत हुतात्मा एक्सप्रेस बंद ठेवली होती. काम करण्यास पावसाची अडचण निर्माण होत असल्याने हाती घेतलेले दुहेरीकरणाचे काम मुदतीत पूर्ण झाले नाही. त्यामुळे या कामास १५ दिवसाची मुदत वाढविली आहे. त्यामुळे १६ सप्टेंबरपर्यंत हुतात्मा एक्सप्रेस बंदच ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.