वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा; जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 16:54 IST2022-07-18T16:54:07+5:302022-07-18T16:54:13+5:30
पंढरपूर :- शेगांव दुमाला ता. पंढरपूर येथील विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या ४३ मुलांना अन्नातून विषबाधा झाली असून, विषबाधा ...

वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा; जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करणार
पंढरपूर :- शेगांव दुमाला ता.पंढरपूर येथील विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या ४३ मुलांना अन्नातून विषबाधा झाली असून, विषबाधा प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिले.
विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या ४३ मुलांना १७ जुलै २०२२ रोजी अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या मुलांची आज अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी भेट घेवून विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार सुशिल बेल्हेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम उपस्थित होते.
विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या मुलांनी शेजारील मोतीराम महाराज मठात पंगत असल्याने जेवायला गेले होते. जेवणानंतर ४३ मुलांना उलट्या, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे जाधव यांनी सांगितले.
तसेच संबंधित ठिकाणच्या जेवणातील सर्व पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेण्यात आले असून, ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिल्याचे अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांनी सांगितले.