दुचाकी शोरूमचा मालक असल्याचे सांगत ट्रेझरी शाखेच्या अधिकाऱ्याला ३३ लाखाला फसवले
By रूपेश हेळवे | Updated: May 28, 2023 15:54 IST2023-05-28T15:53:39+5:302023-05-28T15:54:37+5:30
सरस्वती उंबरजे या आपल्या ऑफीसमध्ये काम करताना एका अज्ञात इसमाने फिर्यादीला फोन करत आपण दुचाकी शोरूमचे मालक असल्याचे बतावणी करत आपल्या शाखेत २ कोटी रुपये मुदत ठेव ठेवायची आहे, असे सांगितले.

दुचाकी शोरूमचा मालक असल्याचे सांगत ट्रेझरी शाखेच्या अधिकाऱ्याला ३३ लाखाला फसवले
सोलापूर : शहरातील एका प्रसिद्ध दुचाकी शोरूमचा मालक बोलत असल्याचे सांगत अज्ञात इसमाने ट्रेझरी शाखेतील शाखा अधिकारी यांना ३३ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगत त्यांना फसविले. याप्रकरणी शाखा अधिकारी सरस्वती सतीश उंबरजे ( वय ४६, रा. अशोक नगर, विजापूर रोड) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २५ मार्च ते २६ मे दरम्यान घडली.
फिर्यादी सरस्वती उंबरजे या आपल्या ऑफीसमध्ये काम करताना एका अज्ञात इसमाने फिर्यादीला फोन करत आपण दुचाकी शोरूमचे मालक असल्याचे बतावणी करत आपल्या शाखेत २ कोटी रुपये मुदत ठेव ठेवायची आहे, असे सांगितले. शिवाय व्याजदाराची माहिती घेतली. त्यानंतर दुचाकी शोरूमच्या नावाने खाते मेल आयडी व खाते तयार करून फिर्यादींना ३३ लाख ७ हजार ५१० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादींनी पैसे ट्रान्सफर ही केले. पण त्यानंतर आपली व बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उंबरजे यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अनोळखी मोबाईल धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंग क्षीरसागर करत आहेत.