Barshi News: गवत्या गल्ली परिसरात भेळ व्यवसाय करणारा विलास हनुमंत पवार (वय २९) या युवकाने भेळच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर शाल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवार, १७ रोजी सकाळी घडली. याबाबत त्याचा भाऊ सागर हनुमंत पवार याने खबर दिली.
मयताचा भाऊ सागर हा नेहमीप्रमाणे आपल्या गवत गल्लीतील भेळ दकानात गेला असता त्याचा भाऊ विलास पवार दुकान साफ करत होता. त्यानंतर सागर हा घरी परत गेला असता त्यास चुलत्यांनी फोनवरून विलास याने दुकानाच्या वरच्या मजल्यावर शाल बांधून गळफास घेतला असल्याचे कळविले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बार्शी पोलिस निरीक्षक बालाजी अंकुश कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी येऊन तपास पथक मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत बार्शी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार ठोंगे करीत आहेत.