धावत्या लोकलच्या दारातून दगडफेक; महिलेने दुसऱ्या ट्रेनवर भिरकावला दगड, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:06 IST2025-10-18T17:05:40+5:302025-10-18T17:06:43+5:30
पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने समोर येणाऱ्या लोकलवर दगड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धावत्या लोकलच्या दारातून दगडफेक; महिलेने दुसऱ्या ट्रेनवर भिरकावला दगड, व्हिडिओ व्हायरल
Social Viral: मुंबई लोकलमध्ये धावत्या ट्रेनवर दगडफेक होण्याच्या घटना अनेकदा घडतात आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. अशीच एक लोकलवरील दगडफेकीची आठवण करून देणारी, पण त्याहूनही अधिक धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये एका माथेफिरू महिलेने तिथल्या ट्रेनवर दगडफेक केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
धावत्या ट्रेनमधून प्रवास करत असताना, अचानक दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रेनवर कोणीतरी दगडफेक करावी, ही कल्पनाही भीतीदायक आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला धावत्या ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभी राहून समोरून येणाऱ्या दुसऱ्या वेगाने धावणाऱ्या ट्रेनवर दगड फेकताना दिसत आहे. हा व्हिडीओ 'नाश अफरोज खान' नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्याला आतापर्यंत ५७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
क्लिपमध्ये साडी नेसलेली एक महिला धावत्या ट्रेनच्या दारात उभी आहे. दुसऱ्या ट्रॅकवरून एक वेगवान ट्रेन त्यांच्या दिशेने येत असताना, महिलेने आपल्या हातातला दगड त्या समोरून येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने फेकला. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये हल्ला अचानक झाला होता असे कॅप्शन दिले आहे.
या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर, मूळ पोस्ट करणाऱ्याने कमेंट्समध्ये अधिक माहिती दिली. त्याच्या म्हणण्यानुसार, ही महिला नशेत दिसत होती आणि तिच्या पिशवीमध्ये अनेक दगड होते. "ती हातात दगड घेऊन लोकांना घाबरवत होती आणि वारंवार दरवाज्यावर मारत होती, त्यामुळे लोक तिच्यापासून दूर राहत होते. अचानक तिने समोरच्या ट्रेनवर दगड फेकला. यात कॅमेरामॅनचा काहीही दोष नाही, तो फक्त एक प्रवासी होता," असे खान याने स्पष्ट केले.
या घटनेमुळे सोशल मीडिया युजर्सनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा कृत्यांवर रेल्वे प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. धावत्या ट्रेनवर दगड फेकल्याने समोरच्या ट्रेनमधील एखाद्या प्रवाशाला गंभीर दुखापत होऊ शकते किंवा मोठा अपघातही होऊ शकतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन या महिलेवर आणि तिच्या धोकादायक कृत्याबद्दल काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.