टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 21:01 IST2025-08-22T20:53:34+5:302025-08-22T21:01:19+5:30
पाच वर्षांपूर्वी भारतात बंदी घातलेला टिकटॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टिकटॉक भारतात परत येत असल्याचे बोलले जात आहे.

टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
भारतात टिकटॉकचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात होते. पाच वर्षांपूर्वी भारतात बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा टिकटॉक चर्चेत आले आहे. टिकटॉक भारतात परत येत असल्याचे बोलले जात आहे. हे प्लॅटफॉर्म चीनचे आहे. काही वापरकर्त्यांनीटीकटॉकची वेबसाईट एक्सेस केल्याची माहिती सोशल मीडियालवर दिली. यामुळे टिकटॉक भारतात परतण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. टिकटॉक अॅप अजूनही गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध नाही. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने जून २०२० मध्ये भारतात टिकटॉकवर बंदी घातली होती.
भारतात या छोट्या व्हिडीओ अॅपच्या परतण्याबाबत टिकटॉक किंवा त्याची मूळ कंपनी बाइटडान्सकडून अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी, वेबसाइट परतल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे. काही वापरकर्त्यांनी एक्सवर याबाबत लिहिले आहे.
२०२० मध्ये बंदी
पाच वर्षांपूर्वी जून २०२० मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने टिकटॉक आणि इतर अनेक लोकप्रिय चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यावेळी सरकारने देशात शेअरइट, एमआय व्हिडीओ कॉल, क्लब फॅक्टरी आणि कॅम स्कॅनरसह ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. केंद्राने टिकटॉक तसेच इतर अॅप्सवर बंदी घालण्याचे कारण राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचे सांगितले. त्यावेळी भारतात टिकटॉकचे सुमारे २०० दशलक्ष वापरकर्ते होते.
हे अॅप्स वापरकर्त्यांचा डेटा चीन सरकारसोबत शेअर करतात अशी माहिती समोर आली होती. 'हे अॅप्स भारताच्या सार्वभौमत्वाला, अखंडतेला आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात', असं भारताच्या आयटी मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले होते.