अबब! २४,४९२ रुपयांऐवजी बँकेने खात्यात पाठवले ७,०८,५१,१४,५५,००,००,००० रुपये अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:56 IST2025-03-01T11:53:27+5:302025-03-01T11:56:25+5:30
बँकेच्या जुन्या कामकाजाच्या समस्येमुळे ही चूक झाली. बराच वेळ होऊनही ही चूक दुरुस्त होऊ शकली नाही.

प्रातिनिधिक फोटो
कधीकधी व्यवहारात चुका होणं सामान्य असतं. पण जर ही चूक बँकेने केली असेल तर धक्काच बसतो. सिटीग्रुपशी संबंधित अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिटीग्रुपने चुकून एका ग्राहकाच्या खात्यात ८१ ट्रिलियन डॉलर (७,०८,५१,१४,५५,००,००,००० रुपये) जमा केले, तर प्रत्यक्षात त्याला फक्त २८० डॉलर (रु. २४४९२ रुपये) पाठवायचे होते. बँकेच्या जुन्या कामकाजाच्या समस्येमुळे ही चूक झाली. बराच वेळ होऊनही ही चूक दुरुस्त होऊ शकली नाही.
दीड तासानंतर लक्षात आली चूक
फायनान्शियल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ही घटना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घडली असल्याचं सांगितलं जात आहे. एका बँकेच्या कर्मचाऱ्याने पेमेंट प्रक्रिया सुरू केली, जी पडताळणीनंतर दुसऱ्या अधिकाऱ्याने मंजूर करायची होती. पण दोघांनाही ही मोठी चूक पकडता आली नाही. सुमारे दीड तासानंतर, तिसऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्याला खात्यातील शिल्लक रकमेतील तफावत लक्षात आली आणि चूक उघडकीस आली.
बँकेने काय म्हटलं?
सिटीग्रुपने म्हटलं आहे की, त्यांच्या सुरक्षा यंत्रणेने वेळीच चूक पकडली आणि ती दुरुस्त करण्यात आली. बँकेने दावा केला की, नियंत्रण व्यवस्था इतकी मजबूत होती की पैसे बँकेतून बाहेर जात नव्हते. या चुकीमुळे बँकेचं किंवा कस्टमचं कोणतंही नुकसान झालं नाही. परंतु यावरून हे स्पष्ट होतं की आपल्याला आपल्या मॅन्युअल प्रोसेस काढून टाकाव्या लागतील आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करावं लागेल.
यापूर्वीही झाल्या आहेत अशा चुका
सिटीग्रुपमध्ये अशी चूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२३ मध्ये बँकेकडून अशा १० चुका झाल्या होत्या. या प्रकरणांमध्ये, कर्मचारी चुकून अधिक पैसे ट्रान्सफर करणार होता परंतु ते वेळेवर दुरुस्त करण्यात आलं. २०२२ मध्ये अशा १३ घटना घडल्या. या चुकांची तक्रार करणं अनिवार्य नाही, म्हणूनच अशा घटनांबद्दल कोणताही अधिकृत डेटा उपलब्ध नाही. परंतु बँकिंग तज्ञांच्या मते, १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचे चुकीचे व्यवहार दुर्मिळ आहेत.