Viral Video: मुलगा कारखाली आला तरी 'तिला' कळलंच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 17:33 IST2018-09-26T17:31:53+5:302018-09-26T17:33:40+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेला भयंकर व्हिडीओ पाहून नेटकरी उद्विग्न झालेत, संतापलेत. हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येतो.

Viral Video: मुलगा कारखाली आला तरी 'तिला' कळलंच नाही!
एका सोसायटीच्या आवारात मुलं फुटबॉल खेळताहेत. एक महिला येते. कार सुरू करते. कारच्या जवळच एक मुलगा बुटाची लेस बांधत असतो. तो तिला दिसत नाही. त्याला कारची धडक बसते, तो कारसोबत काही फूट फरफटत जातो आणि नंतर कारखालीही येतो. तरीसुद्धा या महिलेला काहीच कळत नाही, ती स्वतःच्याच धुंदीत निघून जाते. सुदैवाने मुलगा बचावतो आणि घाबरून धावत-धावत मित्रांजवळ जातो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी उद्विग्न झालेत, संतापलेत. हा व्हिडीओ पाहताना क्षणभर अंगावर काटा येतो. दैव बलवत्तर म्हणून मुलगा वाचल्याचं पाहून हायसं वाटतं, पण या महिलेला ड्रायव्हिंग लायसन्स दिलं कुणी आणि कसं, असा सवाल प्रत्येकाच्या मनात येतो. विविध व्हॉट्स अॅप ग्रूपवर हा व्हिडीओ फिरतोय. ही बाई आंधळी आहे का?, अशा स्वरूपाच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हा व्हिडीओ नेमका कुठला हे कळू शकलेलं नाही. ठाण्याच्या वर्तक नगरमधील सोसायटीत हा प्रकार घडल्याचं काहींचं म्हणणं आहे. परंतु, 'लोकमत डॉट कॉम'ने ठाणे पोलिसांची संपर्क साधला असता, ही घटना ठाण्यातील नसल्याचं जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक नारकर यांनी स्पष्ट केलंय. स्थळ-काळाबद्दल निश्चित माहिती अद्याप मिळाली नसली, तरी हा व्हिडीओ पाहून पालकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.