Gwalior railway station car video : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक अजबच घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी गेल्याने एका नवऱ्याने चक्क रात्रीच्या वेळी आपली कार घेऊन रेल्वे प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला. प्लॅटफॉर्मवर गाडी धावताना पाहून प्रवाशांची पळापळ झाली, आरडाओरडा सुरू झाला, पण हे महाशय तरीही गाडी चालवतच राहिले. त्यांना कोणाच्याही जीवाची पर्वा नव्हती. अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी त्याला मोठ्या प्रयत्नांनी त्याला थांबवले.
प्लॅटफॉर्मवर कार, आणि रेल्वेसोबत रेस लावण्याची सनक!ही घटना बुधवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली. ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर दिल्ली-आग्रा कँट इंटरसिटी ट्रेन थांबली होती. प्रवासी ट्रेनमध्ये चढत-उतरत असताना अचानक प्लॅटफॉर्मवर एक भरधाव कार आली. यामुळे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला आणि प्लॅटफॉर्मवर प्रचंड धावपळ सुरू झाली. कार प्लॅटफॉर्मवर धावताना पाहून प्रवासी सैरावैरा पळू लागले. आरपीएफच्या जवानांनी कसेबसे कार चालकाला पकडले, तेव्हा तो पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद असल्याचे त्यांना आढळले.
काय म्हणाला कार चालक?पकडल्यावर त्याने जे सांगितले ते ऐकून सर्वजण थक्क झाले. तो म्हणाला, "मी ट्रेनसोबत रेस लावायला आलो होतो!" आरपीएफने आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कारही जप्त केली आहे. त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे.
पत्नी माहेरी गेल्याने वैतागलेला पती!पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव नितीन राठोड (रा. आदित्यपुरम) असून तो दारू पिण्याचा व्यसनी आहे. सूत्रांनी सांगितले की, त्याच्या पत्नीने त्याला अनेकदा दारू पिण्यापासून रोखले होते, पण नितिनने तिचे ऐकले नाही. बुधवारीही तो दारू पिऊन घरी परतला, यामुळे त्याची पत्नी चिडली आणि माहेरी निघून गेली.
पत्नी माहेरी गेल्याने नितीन आणखीनच संतापला. त्याने अधिक दारू ढोसली आणि रागाच्या भरात कार घेऊन घराबाहेर पडला. ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एकपर्यंत अवजड वाहनांच्या ये-जा करण्यासाठी झाशीच्या दिशेने एक मार्ग बनवण्यात आला आहे. नितिनने याच मार्गाचा वापर केला आणि तो थेट प्लॅटफॉर्मवर पोहोचला.
'ट्रेनसोबत रेस' ऐकून जवानही थक्क!प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या आरपीएफच्या जवानांनी तात्काळ कार थांबवली आणि नितिनला बाहेर काढले. चौकशी केली असता, नितिनने सांगितले की, "मला ट्रेनसोबत रेस लावायची होती." हे ऐकून जवानही अवाक् झाले.
या घटनेमुळे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने थेट प्लॅटफॉर्मवर कार कशी काय आणली, याची चौकशी सुरू आहे. सध्या तरी या अजब थराराची चर्चा ग्वाल्हेरमध्ये जोरदार सुरू आहे.