पाकिस्तान सध्या जगासमोर आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र नशिबाची साथ काही त्यांना मिळत नाहीये. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीच्या सुरुवातीलाच पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक डार यांच्यासोबत एक अशी घटना घडली, ज्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच फजिती झाली आहे.
नेमकं काय घडलं?
इस्लामाबादमध्ये सौदी अरब, तुर्किये आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांची चारपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या विदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी इशाक डार परराष्ट्र मंत्रालयाच्या बाहेर आले होते. रेड कार्पेटवरून चालत असताना, स्टाईलमध्ये केसांवरून हात फिरवत ते पाहुण्यांच्या दिशेने जात होते. पण, तितक्यात त्यांचा पाय घसरला आणि ते थेट जमिनीवर आडवे झाले.
व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
इशाक डार पडताच तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी धाव घेत त्यांना सावरले. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही आणि ते सुरक्षित आहेत. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. नेटकरी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स करत असून, "पाकिस्तानची अर्थव्यवस्था जशी घसरतेय, तसेच त्यांचे मंत्रीही घसरू लागलेत," अशी टीका काही युजर्सनी केली आहे.
शांततेसाठी पाकिस्तानची धडपड
एकीकडे ही फजिती झाली असली, तरी दुसरीकडे पाकिस्तान या बैठकीच्या माध्यमातून अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. हा धोका ओळखून सौदी, तुर्किये आणि इजिप्तसोबत मिळून बॅकचॅनल चर्चा करण्याचा पाकिस्तानचा मानस आहे. मात्र, सध्या या शांतता चर्चेपेक्षा इशाक डार यांच्या धडाम पडण्याचीच चर्चा जास्त रंगली आहे.
Web Summary : Pakistan's Deputy PM, Ishaq Dar, faced an embarrassing fall on the red carpet while welcoming foreign dignitaries. Despite the mishap, he was unharmed. The video went viral, sparking humorous reactions online. Pakistan is attempting to mediate tensions between the US and Iran amidst global concerns.
Web Summary : पाकिस्तान के उप प्रधानमंत्री इशाक डार विदेशी मेहमानों का स्वागत करते समय रेड कार्पेट पर फिसल गए। इस घटना से उनकी अंतरराष्ट्रीय स्तर पर किरकिरी हुई। वीडियो वायरल हो गया। पाकिस्तान अमेरिका और ईरान के बीच तनाव कम करने की कोशिश कर रहा है।