Video : विदेशी पाहुण्यांच्या स्वागताला गेले अन् धपकन पडले; पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांची रेड कार्पेटवर फजिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 19:07 IST2026-03-29T19:07:12+5:302026-03-29T19:07:49+5:30
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार विदेशी पाहुण्यांच्या स्वागतावेळी रेड कार्पेटवर पाय घसरून पडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून इस्लामाबादमधील बैठकीत मोठी फजिती झाली.

Video : विदेशी पाहुण्यांच्या स्वागताला गेले अन् धपकन पडले; पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांची रेड कार्पेटवर फजिती
पाकिस्तान सध्या जगासमोर आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र नशिबाची साथ काही त्यांना मिळत नाहीये. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीच्या सुरुवातीलाच पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक डार यांच्यासोबत एक अशी घटना घडली, ज्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच फजिती झाली आहे.
नेमकं काय घडलं?
इस्लामाबादमध्ये सौदी अरब, तुर्किये आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांची चारपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या विदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी इशाक डार परराष्ट्र मंत्रालयाच्या बाहेर आले होते. रेड कार्पेटवरून चालत असताना, स्टाईलमध्ये केसांवरून हात फिरवत ते पाहुण्यांच्या दिशेने जात होते. पण, तितक्यात त्यांचा पाय घसरला आणि ते थेट जमिनीवर आडवे झाले.
نائب وزیراعظم اسحاق ڈار دفتر خارجہ میں مہمان وزرا خارجہ کا استقبال کرتے ہوئے فرش پر گر گئے۔ شکر ہے محفوظ رہے!!! pic.twitter.com/v82rMi3KOp
— Nadir Baloch (@BalochNadir5) March 29, 2026
व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
इशाक डार पडताच तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी धाव घेत त्यांना सावरले. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही आणि ते सुरक्षित आहेत. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. नेटकरी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स करत असून, "पाकिस्तानची अर्थव्यवस्था जशी घसरतेय, तसेच त्यांचे मंत्रीही घसरू लागलेत," अशी टीका काही युजर्सनी केली आहे.
शांततेसाठी पाकिस्तानची धडपड
एकीकडे ही फजिती झाली असली, तरी दुसरीकडे पाकिस्तान या बैठकीच्या माध्यमातून अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. हा धोका ओळखून सौदी, तुर्किये आणि इजिप्तसोबत मिळून बॅकचॅनल चर्चा करण्याचा पाकिस्तानचा मानस आहे. मात्र, सध्या या शांतता चर्चेपेक्षा इशाक डार यांच्या धडाम पडण्याचीच चर्चा जास्त रंगली आहे.