Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:58 IST2025-11-07T11:57:35+5:302025-11-07T11:58:12+5:30
एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओने लाखो लोकांची मनं जिंकली.

Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओने लाखो लोकांची मनं जिंकली. व्हिडिओमध्ये एका वडिलांना आपला मुलगा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाल्यावर फार आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सर्वच जण हा व्हिडीओ पाहून भावुक झाले. इन्स्टाग्राम युजर्स अनुज सिन्हा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांचा मुलगा रोशन सिन्हा सीए झाल्याचं म्हटलं आहे.
अनुज यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, "सीए रोशन सिन्हा, तुम्ही आज वातावरणचं बदलून टाकलं आहे... बॅकबेंचर ते सीए होण्याचा तुझा प्रवास तुझ्या डेडिकेशनचा परिणाम आहे. हे यश वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमाचं, असंख्य जागवलेल्या रात्री आणि आत्मविश्वासाचं, संघर्षांचं फळ आहे. हा प्रवास फक्त तुझा नव्हता तर संपूर्ण कुटुंबाचा होता. या मिठीत प्रत्येक त्याग, प्रार्थना आणि प्रत्येक कठोर परिश्रम आहे ज्यामुळे हा क्षण आला."
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कामावरून थकून आपल्या घरी येते. त्यांच्या हातात भाजीची पिशवी आणि दुसऱ्या हातात ऑफिस बॅग आहे. ते दरवाजातून आतमध्ये आल्यावर पत्नी येते आणि हा सीए झाला असं म्हणते. यानंतर रोशन त्याच्या वडिलांकडे जातो आणि त्यांना नमस्कार करतो. त्याचे वडील त्याला घट्ट मिठी मारतात. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, तर त्याची आई त्यांच्या शेजारी उभी राहून हे दृश्य भावनिकपणे पाहते.
या दृश्याने सर्वच जण खूप भावुक झाले. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल झाला आणि हजारो युजर्सनी कमेंटमध्ये कुटुंबाचं अभिनंदन केलं. अनेकांनी लिहिलं की, व्हिडीओ त्यांना आठवण करून देतो की प्रत्येक यशामागे कुटुंबाचे आशीर्वाद, त्याग आणि विश्वास असतो. या व्हिडीओपासून अनेकांना आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.