VIRAL VIDEO : दिवाळीच्या फुलबाज्या कशा बनवल्या जातात? फॅक्टरीतला व्हिडीओ होतोय व्हायरल! बघाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:16 IST2025-10-17T14:16:17+5:302025-10-17T14:16:40+5:30
Diwali 2025: सध्या सोशल मीडियावर फुलबाजा बनवणाऱ्या फॅक्टरीतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे, ज्याने कोट्यवधी युजर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे.

VIRAL VIDEO : दिवाळीच्या फुलबाज्या कशा बनवल्या जातात? फॅक्टरीतला व्हिडीओ होतोय व्हायरल! बघाच...
दिवाळीचा सण जवळ आला की, बाजारात सगळ्यात आधी दिसू लागणाऱ्या फटाकड्या म्हणजे फुलबाजे. पण, ही चमकणारी आणि चेहऱ्यावर हास्य फुलवणारी फुलबाजी तयार कशी होते, याचा कधी विचार केला आहे का? सध्या सोशल मीडियावर फुलबाजा बनवणाऱ्या फॅक्टरीतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे, ज्याने कोट्यवधी युजर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. फुलबाजा बनवण्याची पारंपारिक आणि अत्यंत धोकादायक पद्धत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
इन्स्टाग्रामवर 'thefoodiehat' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये कामगार कशा पद्धतीने फुलबाजे तयार करतात, हे दाखवले आहे. फुलबाजे बनवण्यासाठी सुरुवातीला ॲल्युमिनियम पावडर, बोरिक ॲसिड आणि ऑक्सिडायझर सारख्या ज्वलनशील घटकांचा समावेश असलेले एक धोकादायक रासायनिक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर पातळ तारांना एका साच्यात ठेवून त्यांना या जाडसर रासायनिक मिश्रणात बुडवले जाते.
फुलबाज्यामध्ये योग्य प्रमाणात दारू जमा व्हावी यासाठी ही प्रक्रिया दोनदा केली जाते. त्यानंतर या तारा उन्हामध्ये वाळवल्या जातात. शेवटी, या तयार झालेल्या फुलबाज्या आकर्षक डब्यांमध्ये पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात.
थरारक प्रक्रिया
फुलबाजा बनवण्याची प्रक्रिया या व्हिडीओमध्ये जितकी सोपी दिसते, तितकीच ती जीवघेणी आहे. कारण, या कामात जरा जरी निष्काळजीपणा झाला, तर मोठी आग लागून मोठा अपघात होऊ शकतो. या व्हिडीओचा सर्वांत धक्कादायक भाग म्हणजे, कामगार हे अत्यंत जोखमीचे काम करताना कोणत्याही प्रकारचे सेफ्टी उपकरण, हातमोजे किंवा मास्क वापरत नाहीत. रासायनिक मिश्रण हाताळणे आणि ज्वलनशील पदार्थांशी थेट संपर्क, हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी मोठे आव्हान आहे.
युजर्सच्या भावनांचा कल्लोळ
हा व्हिडीओ आतापर्यंत कोट्यवधी वेळा पाहिला गेला आहे आणि १४ लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये देखील लोक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी या कामगारांच्या मेहनतीला सलाम केला आहे. एका युजरने भावूक होत लिहिले की, "आपल्या सणांमध्ये आनंद आणि प्रकाश आणण्यामागे असंख्य हातांची मेहनत दडलेली असते." तर दुसऱ्या बाजूला अनेक युजर्सने कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका युजरने थेट विचारले, “सेफ्टी नाही, मास्क नाही, हातमोजे नाहीत. हे कामगारांचे शोषण आहे."