VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 15:53 IST2025-10-23T15:51:55+5:302025-10-23T15:53:32+5:30
सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड येत असतात, पण सध्या इंटरनेटवर 'फायर हँडशेक' नावाच्या एका जीवघेण्या ट्रेंडने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड येत असतात, पण सध्या इंटरनेटवर 'फायर हँडशेक' नावाच्या एका जीवघेण्या ट्रेंडने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः दिवाळीच्या उत्सवा दरम्यान हा ट्रेंड व्हायरल होत आहे. या स्टंटमध्ये लोक हस्तांदोलन करताना हातांमध्ये आगीचा असा भास निर्माण करतात, जणू काही त्यांच्या तळहातातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत आहेत.
हा ट्रेंड नेमका काय आहे?
'फायर हँडशेक' ट्रेंडची सुरुवात काही व्हायरल इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्समधून झाली. यामध्ये मित्र हस्तांदोलन करण्यापूर्वी आपल्या तळहातावर हँड सॅनिटायझर, पेट्रोल किंवा एअरोसोल स्प्रे यांसारखे ज्वलनशील पदार्थ लावून पेटवतात. यामुळे काही क्षणांसाठी तळहाताच्या मधून आगीच्या ज्वाला उठताना दिसतात.
कंटेंट क्रिएटर्स याला व्हायरल करत आहेत. अनेक व्हिडीओंना लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाल्याने तरुणाईमध्ये हा स्टंट करण्याची क्रेझ वाढताना दिसत आहे.
स्टंटमध्ये धोका काय आहे?
कंटेंट क्रिएटर्स या व्हिडीओमध्ये तळहातावर अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझरचा पातळ थर लावतात, जो अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे लगेच पेट घेतो. काळजीपूर्वक हाताळल्यास तो कोणत्याही कायमस्वरूपी नुकसानीशिवाय पटकन जळून जातो असे म्हटले जात असले तरी,हे खरे नाही. डॉक्टर आणि तज्ज्ञांनी या स्टंटबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लोक या स्टंटला दिवाळीचा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानत असले तरी, यात वापरले जाणारे पदार्थ अत्यंत ज्वलनशील आहेत. एका क्षुल्लक चुकीमुळे यात गंभीर स्वरूपात भाजणे, फोड येणे किंवा मोठी आग लागण्याची दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
म्हणूनच, व्हायरल व्हिडीओमध्ये हा स्टंट कितीही आकर्षक दिसत असला तरी, तो प्रत्यक्ष करण्याचा धोका अनेकांच्या आरोग्यासाठी कायमस्वरूपी धोकादायक ठरू शकतो, अशी चेतावणी तज्ज्ञांनी दिली आहे.