VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:02 IST2025-09-12T14:01:53+5:302025-09-12T14:02:29+5:30
Avocado Pani Puri Viral Video: सोशल मीडियावर पाणीपुरीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो बघितल्यानंतर आता नेटकरी देखील संतापले आहेत.

VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
स्ट्रीट फूड आणि त्यातही पाणीपुरी म्हटलं की, तोंडाला पाणी सुटत नाही असं क्वचितच कुणी असेल. मात्र, आता सोशल मीडियावर पाणीपुरीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो बघितल्यानंतर आता नेटकरी देखील संतापले आहेत. आता तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल, की यात एवढं काय आहे? पण, तुम्हीही पाणीपुरी प्रेमी असाल, तर हा व्हिडीओ बघून कदाचित तुम्हीही अशीच प्रतिक्रिया देऊ शकता.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक अतरंगी पाणीपुरी रेसिपी पाहायला मिळाली आहे. पण, या रेसिपीवर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता असं वाटत आहे की, कुणालाच ही रेसिपी आवडलेली नाही. पण, या रेसिपीने आता इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गुरुग्रामच्या गॅलेरिया मार्केटमधील एका दुकानात ही पाणीपुरी विकली जात असून, यात बटाटा किंवा रगड्याऐवजी चक्क अॅवकाडो, कांदा आणि टोमॅटोचे मिश्रण टाकण्यात येत आहे. अर्थात ही अॅवकाडो पाणीपुरी आहे.
किंमत ऐकाल तर हैराण व्हाल!
एकीकडे या विचित्र रेसिपीची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे या व्हायरल अॅवकाडो पाणीपुरीची किंमत ऐकून सगळ्यांना धक्का बसला आहे. एक प्लेट अर्थ ६ अॅवकाडो पाणीपुरीसाठी तब्बल २२० रुपये आकरले जात आहेत. ही किंमत ऐकून देखील नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकरी काय म्हणाले?
सोशल मीडियावर ही व्हायरल अॅवकाडो पाणीपुरी बघून एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, "हा आमच्या पाणीपुरीचा अपमान आहे." दुसऱ्या एकाने लिहिले की, "२२० रुपयांची पाणीपुरी कोण खाणार? एवढ्यात तर आमचं संपूर्ण कुटुंब पाणीपुरी खाऊन येईल." तर, काही लोक या पणीपुरीची तुलना 'सूर्यवंशम'च्या खीरसोबत करत आहेत.