VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:12 IST2025-10-06T11:11:59+5:302025-10-06T11:12:23+5:30
आजारी असताना काम करण्याची इच्छा होत नाही आणि अशा परिस्थितीत कोणी तुम्हाला जबरदस्तीने ऑफिसला बोलावले तर काय होईल?

VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच
डोकेदुखी, थकवा किंवा हलका ताप येणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. आजारी असताना काम करण्याची इच्छा होत नाही आणि अशा परिस्थितीत कोणी तुम्हाला जबरदस्तीने ऑफिसला बोलावले तर काय होईल? बेंगळूरु किंवा इतर महानगरांमधील अनेक खासगी कंपन्यांमध्ये सध्या असाच एक संतापजनक प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. एका कंपनीतील कर्मचाऱ्याने डोकेदुखी असताना सुट्टी मागितली, पण मॅनेजरने ती नाकारली. यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्याने या चॅटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. दोघांची ही चॅट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे, ज्यामुळे कंपनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.
डोकेदुखी आहे तरी सुट्टी नाही मिळत!
एका कर्मचाऱ्याने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या मॅनेजरसोबतच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने 'डोकेदुखी असताना कोणी कसे काम करू शकते?' असा प्रश्न विचारला आहे.
या व्हायरल चॅटनुसार, कर्मचाऱ्याने मॅनेजरला डोकेदुखीमुळे ऑफिसला येऊ शकत नसल्याचे सांगितले. यावर मॅनेजरने दिलेला प्रतिसाद अधिक धक्कादायक आहे. मॅनेजर त्याला म्हणाला, "औषध घे आणि ऑफिसला ये. डोकेदुखीच तर आहे, बरी होईल."
कर्मचाऱ्याने 'डोलो घेऊन पाहतो' असं उत्तर दिलं. थोड्या वेळाने त्याने पुन्हा मॅनेजरला मेसेज करून डोकेदुखी थांबली नसल्याचे सांगितले. यावर मॅनेजरने त्याला पुन्हा फटकारले. त्याने "औषध घे ना हिरो. डोकेदुखीवर थोडीच सुट्टी मिळते. तू आता शाळेत नाही, कंपनीत आहेस. थोडा आराम कर, पण ऑफिसला ये", असे म्हटले.
युजर्सही संतापले!
हा स्क्रीनशॉट व्हायरल होताच नेटिझन्सनी मॅनेजरच्या या वृत्तीवर जोरदार टीका केली आहे. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, "हे खूप भयानक आहे. तुमच्याकडे सीक लीव्ह असतील,फक्त रजेसाठी अर्ज करा आणि सरळ घरीच थांबा." दुसऱ्या एका युजरने कर्मचाऱ्याला सल्ला दिला की, "नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही नसलात तरी तुमची जागा घेण्यासाठी दुसऱ्याला आणायला हे लोक थोडाही विचार करणार नाहीत. म्हणून कधीही आपले १०० टक्के देऊ नका."
काही युजर्सनी कर्मचाऱ्याला खंबीर राहण्याचा सल्ला देत म्हटले, "ऑफिसला अजिबात जाऊ नकोस. तुझ्या बोलण्यावर ठाम रहा. दुसऱ्या व्यक्तीला तुझ्या मर्यादा ओलांडू देऊ नकोस." अनेक युजर्सनी खासगी कंपन्यांच्या या 'टॉक्सिक वर्क कल्चर'वर बोट ठेवत, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे आणि अधिकारांकडे होणाऱ्या दुर्लक्षावर आपला संताप व्यक्त केला आहे.