वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:12 IST2025-11-15T17:02:52+5:302025-11-15T17:12:23+5:30
बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन तोडल्यानंतर, एका संतप्त तरुणाने पूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित केला आणि केरळचे हे शहर अंधारात बुडाले.

वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
वीज बिल वेळच्या वेळी भरण्यासाठी नियम बनवले आहेत. तुम्ही जर वेळेत बिल भरले नाही तर वीज विभाग आपली वीज बंद करु शकते, वीज बिलाबाबत केरळच्या कासरगोड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीज बिल न भरल्यामुळे केरळ राज्य विद्युत मंडळाने एका तरुणाच्या घराचा वीजपुरवठा बंद केला. यामुळे संतप्त झालेल्या त्या तरुणाने थेट सात ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे.
या कृत्यामुळे कासरगोड शहरातील अनेक भागात अंधार पसरला आणि वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला.
ही संपूर्ण घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६:४५ वाजता घडली. घरातील वीज बंद झाल्यानंतर संतापलेल्या त्या व्यक्तीने परिसरातील सात ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज काढून मोठा गोंधळ उडवला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेबाबत केएसईबीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “काही मिनिटांतच कासरगोड शहरातून लाईन बिघाडाच्या तक्रारी वाढल्या. मात्र, सुरुवातीला लाईन तपासल्यावर कोणतीही तांत्रिक अडचण आढळली नाही. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर्सची तपासणी केली असता त्यांच्या फ्यूज काढून टाकल्याचे लक्षात आले.
रात्री ८ वाजता वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला
केरळ राज्य वीज मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही परिसरात शोध घेतला तेव्हा आम्हाला ट्रान्सफॉर्मरजवळ फ्यूज पडलेले आढळले. काही फ्यूज खराब झाले होते, त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आम्हाला अतिरिक्त फ्यूज वापरावे लागले.
स्थानिकांनी फ्यूज काढताना पाहिले
रहिवाशांनी केएसईबी कर्मचाऱ्यांना सांगितले की त्यांनी एका तरुणाला फ्यूज काढताना पाहिले. संशयित हा नेल्लीकुझी परिसरातील रहिवासी आहे. त्यांनी असेही सांगितले की, तोच तरुण यापूर्वी सेक्शन ऑफिसमध्ये आला होता आणि त्याचे बिल न भरल्यामुळे त्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तेव्हा त्याने गोंधळ घातला होता.
पोलिसांनी चौकशी केली
माहितीच्या आधारे, पोलिसांनी त्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्या तरुणाने सांगितले की त्याला मानसिक आरोग्य समस्या आहेत आणि तो त्याच्या वृद्ध वडिलांसोबत राहतो. केएसईबीने अधिकृत तक्रार दाखल केल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. केएसईबी अधिकाऱ्यांनी सांगितले की ते शनिवारी तक्रार दाखल करतील, कारण अनेक फ्यूज खराब झाले होते आणि या घटनेमुळे एक तासापेक्षा जास्त काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.