अरे बापरे! घरी एक बल्ब अन् पंखा, पण आलेलं वीज बील पाहून कुटुंबाला धक्काच बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:38 IST2025-02-04T14:34:55+5:302025-02-04T14:38:26+5:30
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाचे वीज बिल ७.३३ कोटी रुपये आले. हे बील पाहून संपूर्ण शेतकरी कुटुंब तणावात आहे.

अरे बापरे! घरी एक बल्ब अन् पंखा, पण आलेलं वीज बील पाहून कुटुंबाला धक्काच बसला
आपल्याकडे शेतकरी कुटुंबात वीज बील एक हजार ते दोन हजार रुपयांच्या आसपास येतं. सध्या सोशल मीडियावर एक वीज बील व्हायरल झालं आहे. हे बील पाहून अनेकांनी डोक्यालाच हात लावला आहे. एखाद्या मोठ्या कंपनीला सुद्धा एवढं वीज बील येत नसेल. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील आहे. येथे मोलहू नावाच्या शेतकऱ्याला वीज विभागाने ७.३३ कोटी रुपयांचे मोठे बिल दिले. वीज बिल पाहून मोल्हू यांना धक्काच बसला. कारण त्यांच्या मालमत्तेची किंमत वीज बिलाइतकीही नाही.
बस्ती जिल्ह्यातील हरैया उपकेंद्राच्या केशवपूर फीडरच्या रमया गावातील रहिवासी मोलहू यांनी २०१४ मध्ये एक किलोवॅट वीज कनेक्शन घेतले होते. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांचे वीज बिल ७५ हजार रुपये होते आणि एका महिन्यानंतर त्यांचे बिल ७ कोटी ३३ लाख रुपये आले. जेवढे बिल आले आहे, ते मी माझी संपूर्ण मालमत्ता विकूनही भरू शकणार नाही, असंही त्या शेतकऱ्यांनी सांगितलं.
'एका महिन्यात बील वाढले'
पीडित शेतकरी मोलहू यांच्या मुलाने सांगितले की, वीज विभागाचे कर्मचारी गावात तपासणीसाठी आले होते. त्यांनी माझ्या वडिलांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून वीज बिल तपासले तेव्हा त्यांना सांगितले की, त्यांचे थकित बिल ७.३३ कोटी रुपये आहे. हे लवकर सबमिट करा. गेल्या महिन्यापर्यंत वीज बिल सुमारे ७५ हजार रुपये थकले होते, त्यांचा मेसेज मोबाईलवरही आला होता. पण फक्त एका महिन्यानंतर, कोट्यवधींचे वीज बिल आले.
"या बीलाची माहिती आईला कळाली तेव्हा तिची तब्येतही बिघडली. आम्ही यासंदर्भात तक्रार दाखल केली. आमच्या घरात फक्त पंखा आणि एक बल्ब आहे. या परिस्थितीत कोटींचे बिल कसे आले? पण आमचे कोणी ऐकत नाही, आम्हाला खूप त्रास होतो. एवढं मोठं बिल एक सामान्य माणूस कसा भरू शकेल?, असा सवालही त्यांनी केला.
या प्रकरणावर, अधीक्षक अभियंता म्हणाले की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. हरैयाच्या एक्सईएनला कळवण्यात आले आहे. वीज बिल लवकरच दुरुस्त केले जाईल.