VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:57 IST2025-10-08T11:56:05+5:302025-10-08T11:57:23+5:30
सध्या सोशल मीडियावर झोमॅटोचे २०१९ सालातील एक बिल व्हायरल झाले आहे, जे पाहून लोकांना जुन्या दिवसांची आठवण आली आहे.

VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
आजकाल फूड डिलिव्हरी ॲप्सवरून जेवण ऑर्डर करताना मूळ पदार्थाच्या किमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. डिलिव्हरी चार्ज, प्लॅटफॉर्म फी आणि टॅक्स मिळून बिल इतकं वाढतं की, कधीकधी ऑनलाइन मागवणं महागडं वाटतं. पण, एक काळ असा होता जेव्हा ऑनलाइन जेवण मागवणं खरंच स्वस्त आणि सोयीचं होतं.
सध्या सोशल मीडियावर झोमॅटोचे २०१९ सालातील एक बिल व्हायरल झाले आहे, जे पाहून लोकांना जुन्या दिवसांची आठवण आली आहे. कारण, त्या वेळी डिलिव्हरी चार्ज आणि प्लॅटफॉर्म फी सारखे कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नव्हते.
९.६ किलोमीटरवरून मागवले, तरीही चार्ज शून्य!
Redditवर शेअर करण्यात आलेल्या या व्हायरल बिलानुसार, एका युजरने तब्बल ९.६ किलोमीटर दूर असलेल्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतक्या लांब असूनही युजरकडून डिलिव्हरी चार्ज किंवा कोणतीही अतिरिक्त फी आकारली गेली नाही.
युजरने ₹१६० किमतीचे पनीर मलाई टिक्का ऑर्डर केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याने यावर डिस्काउंट कूपन वापरले, ज्यामुळे त्याला मोठी सूट मिळाली आणि त्याचे एकूण बिल अवघे ₹९२ झाले!
Zomato order from 7 years ago
byu/No-Win6448 inZomato
आज ऑर्डर केल्यास होईल तिप्पट खर्च
या पोस्टमध्ये युजरने नॉस्टॅल्जिया व्यक्त करत लिहिले आहे की, "तो काळ खरंच वेगळा होता, जेव्हा फूड डिलिव्हरी कंपनीचे नाव ऐकताच स्वस्त आणि सोपा फूड डिलिव्हरी पर्याय आठवायचा. त्या वेळी कूपन कोडचा अर्थ खरी सूट असायचा, आजच्यासारखा फक्त दिखावा नाही." या युजरने असा दावाही केला की, आज जर हाच पदार्थ ऑर्डर करायचा झाला, तर तो कमीतकमी ३०० रुपयांना पडेल. कारण, गेल्या काही वर्षांत जेवणाच्या किमती जवळपास दुपटीने वाढल्या आहेत आणि त्यात आता डिलिव्हरी शुल्कही जोडले गेले आहे.
ॲप्सनी का बदलले नियम?
हा बिल व्हायरल होताच सोशल मीडियावर फूड डिलिव्हरी ॲप्सच्या बदललेल्या मॉडेलवर चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही ॲप्स कमी किंमत आणि बंपर सूट देत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत नेटवर्क आणि डिलिव्हरी सिस्टीम खूप वाढला आहे. डिलिव्हरी एजंट्सचा पगार, पेट्रोलचे दर, तांत्रिक सुधारणा आणि रेस्टॉरंट पार्टनरशिप यांवर मोठा खर्च येतो. हा वाढता खर्च भरून काढण्यासाठी कंपनीने हळूहळू प्लॅटफॉर्म फी, डिलिव्हरी चार्ज आणि डायनॅमिक प्राइसिंग लागू करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आता ऑनलाइन जेवण मागवणं तुलनेने महाग झालं आहे.