Marathi Language Controversy:महाराष्ट्रात सध्या हिंदी आणि मराठीचा वाद पेटला आहे. महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठी शिकावीच लागेल, असा पवित्रा शिवसेना आणि मनसेने घेतला आहे. दरम्यान, मुंबईत परप्रातीयांना मारहाण झाल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदी भाषीक राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच, हरयाणातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
'हरियाणवी ताऊ'ने मराठी तरुणाला जवळ बोलावले अन्...या व्हिडिओमध्ये शेतात उभा असलेला एक हरियाणवी ताऊ अचानक आक्रमक स्वरात विचारतो, इथे महाराष्ट्रातून कोण आलयं? इकडे ये...जेव्हा एक तरुण त्याच्या जवळ येऊन उत्तर देतो की, तो महाराष्ट्रातील नाशिकवरुन आलाय. त्यावर तो व्यक्ती हरियाणवी भाषा बोलण्यास सांगतो. जेव्हा तो तरुण म्हणतो मला येत नाही. त्यावर तो व्यक्ती म्हणतो, मग तू इथे कसा आलास? इथे कसा काम करतोस? हे सर्व पाहून तो तरुण थोडा घाबरलेला दिसतो.
पोस्टवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया पण, नंतर त्या व्यक्तीचे वर्तन बदलते. तो हसून म्हणतो, हा तुझा देश आहे, तू नाही तर कोण काम करणार...भारत तुझा देश आहे, तुला हवे ते कर, असे म्हणत त्याला मिठी मारतो. हा व्हिडिओ @MeghUpdates नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत, तर काही याला चांगला संदेश म्हणत आहेत.