Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 11:48 IST2025-10-26T11:48:06+5:302025-10-26T11:48:57+5:30
पवित्र शत्रुंजय टेकडीवर सिंहांचे दर्शन झाल्याने भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
भावनगर (गुजरात): जिल्ह्यातील पालीतना शहरातील पवित्र शत्रुंजय टेकडीवर सिंहांचे दर्शन झाल्याने भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. या घटनेचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यात भाविकांच्या रांगेत सिंह मुक्तपणे वावरताना दिसतोय. ही दुर्मिळ घटना लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. राज्य वन विभागानेही या व्हिडिओंची पुष्टी केली असून, ही टेकडी सिंहांचा नैसर्गिक अधिवास असल्याचे सांगितले.
व्हिडिओ व्हायरल
Lioness spotted on the pathways of a very known Jain pilgrimage destination of Palitana in Gujarat today. Lions frequenting this side of Hill are unheard to me. #Palitana#Lions#wildlifepic.twitter.com/mqZE2w08qe
— Nirbhay (@NirbhayShah) October 24, 2025
पहिल्या व्हिडिओमध्ये एक सिंह शांतपणे भाविकांसोबत दिसतो, तर गार्ड हातात लाठी घेऊन भाविकांचे रक्षण करताना दिसतोय. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सिंह एका जोडप्यामागे चालताना दिसतो; हे जोडपे टेकडीवरील प्रदक्षिणा मार्गावर अनवाणी चालत होते. यावेळी गार्ड त्यांना सावध राहण्याचे निर्देश देतो.
वन विभागाची प्रतिक्रिया
गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) जयपाल सिंग यांनी सांगितले की, व्हिडिओ खरे आहेत. शत्रुंजय टेकडी आणि परिसर सिंहांच्या नैसर्गिक अधिवासाचा भाग आहे. गेल्या जनगणनांमध्ये येथे सिंहांची चांगली संख्या नोंदवली गेली आहे.
🚨 LION CAME AT GUJARAT JAIN TEMPLE 🚨
— Jeet (@JeetN25) October 24, 2025
Four lions spotted at Gujarat palitana jain temple 🔥😨 pic.twitter.com/8XOR1blawg
भावनगरचे उपवनसंरक्षक (DCF) योगेश देसाई यांनी माहिती दिली की, या परिसरात सध्या सुमारे आठ सिंहांचा एक कळप आहे. पालीतना आणि संपूर्ण भावनगर जिल्ह्यात सिंहांची घनता तुलनेने जास्त आहे. आम्ही टेकडीचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रस्ट अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे आणि सिंहांच्या वर्तनाचे ज्ञान असलेले प्रशिक्षित गार्ड तैनात केले आहेत.
इतर भागांतही सिंहाचे दर्शन
सिंहांचे दर्शन फक्त पालीतनापुरते मर्यादित नाही. भावनगर जिल्ह्यातील वलभीपूर, किनारपट्टी भाग आणि शेजारील बोटाद जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसांत सिंह दिसल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. वन विभाग स्थानिक नागरिकांना सिंहांच्या जवळ न जाण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करत आहे. तसेच, सिंह दिसल्यास त्वरित प्रशासनाला माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत.