Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:31 IST2025-12-17T15:30:00+5:302025-12-17T15:31:32+5:30
या लग्नात तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हा प्रकार सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे

Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील भाजपा आमदार राकेश शुक्ला उर्फ गोलू शुक्ला सध्या चर्चेत आहेत. इंदूर येथे त्यांचा मुलगा अंजनेशच्या लग्नात तब्बल ७० लाखांचे फटाके फोडल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोलू शुक्ला मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६१ कोची ५० लाखाहून अधिक आहे. राकेश उर्फ गोलू शुक्ला इंदूरमधील मोठे व्यावसायिक आहेत. ते बिल्डिंग मटेरियलपासून क्रेन व्यवसायाशी निगडीत आहेत. शुक्ला यांच्याकडे ५ फॉर्च्यूनर कार आणि ८ हून अधिक क्रेन आहेत.
राकेश शुक्ला यांच्या पत्नी मुग्धा शुक्ला यांच्या नावावर एक पेट्रोल पंपही आहे. आमदार राकेश शुक्ला आणि त्यांचा मुलगा रुद्राक्ष काही महिन्यापूर्वी एका वादात अडकले होते. जेव्हा महाकाल मंदिरात दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखले तेव्हा शुक्ला यांच्या मुलाने तिथल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली होती. अलीकडेच शुक्ला यांचा मुलगा अंजनेश याचे लग्न झाले. या लग्नात तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हा प्रकार सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. खजराना मंदिरात या नवविवाहित जोडप्यांनी एकमेकांना हार घालून नव्या जीवनाची सुरुवात केली.
शाही लग्नातील खर्चामुळे चर्चेत
अंजनेशच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वर्षातील सर्वात मोठा लग्न सोहळा म्हणून लोक त्यावर चर्चा करत आहेत. या शाही लग्नात झालेल्या खर्चावरून अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. लग्नाचे स्थळ एखाद्या शाही महालाप्रमाणे सजवण्यात आले होते. यावेळी झालेल्या आतषबाजीत ७० लाखांचे फटाकेही फोडले असे बोलले जाते. या लग्न सोहळ्याचं आयोजन इतके भव्य करण्यात आले होते की ते पाहण्यासाठी दूर दूरहून लोक पोहचले होते. एखाद्या सेलिब्रिटीच्या लग्नाहून जबरदस्त आणि शानदार सोहळा पार पडला असं सोशल मीडियावर लोक सांगत आहेत.
या लग्नातील सर्वांचं आकर्षण राहिले ते म्हणजे आतषबाजी. केवळ फटाके आणि आतषबाजी करण्यासाठी ७० लाखाहून अधिक खर्च करण्यात आला. जेव्हा आतषबाजी सुरू झाली तेव्हा रंगीबेरंगी रोषणाईने आसमंत उजळून निघाले होते. अनेक मिनिटे या आतषबाजीकडे पाहण्यासाठी लोक मान वर करून बसले होते. जोरदार आवाज, चमकदार लाईट्स यामुळे लग्नस्थळी वेगळेच वातावरण तयार झाले. हा लग्न सोहळा एखाद्या फिल्मच्या सेटहून कमी वाटत नव्हते. खास थीमवरून ते सजवले होते. सुंदर फुलांची सजावट आणि मॉडर्न डिझाईनने सगळेच अचंबित झाले होते.