Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 15:49 IST2026-04-11T15:48:36+5:302026-04-11T15:49:04+5:30
बऱ्याच जणांना हा एक चांगला आर्थिक निर्णय वाटणार नाही, पण मला नोकरी सोडायची असल्यामुळे कर्जाचा त्रास नको होता असे अवनीने स्पष्ट सांगितले

Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
इन्स्टाग्रामवर अनेक रिल्स दररोज व्हायरल होत असतात. सध्या एका मुलीची रिल व्हायरल होतेय, ज्यात तिने कशाप्रकारे प्लॅनिंग करून अवघ्या २ वर्षातच तिचे ३० लाखाचं शैक्षणिक कर्ज फेडल्याचे सांगितले आहे. या मुलीने आयआयएम कोलकाता येथे एमबीएचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ३० लाखांचे कर्ज घेतले होते.
अवनी राठोड असं या मुलीचं नाव आहे. तिने सांगितले की, मी आयएमएम कोलकाता येथून एमबीए शिक्षणासाठी घेतलेले ३० लाखाचे कर्ज २ वर्षात फेडले आहे. ज्यासाठी मी ४ ट्रीकचा वापर केला. सर्वात आधी एमबीएच्या आधीची बचत, MBA करण्यापूर्वी मी २ वर्ष काम केले होते. मी माझ्या गुंतवणुकीला (म्युच्युअल फंड, पीपीएफ) अजिबात हात लावला नाही, उलट माझे शुल्क भरण्यासाठी माझ्याकडील लिक्विड बचतीचा वापर केला. दुसरी ट्रीक म्हणजे इंटर्नशिप स्टायपेंड, MBA शिकताना मी समर इंटर्नशिप केली होती. ज्यात मला चांगली रक्कम मिळाली असं तिने सांगितले.
त्यानंतर तिसरे मी पार्ट टाइम नोकरी केली. मला प्री प्लेसमेंट ऑफर मिळाली होती म्हणून मी एमबीएच्या दुसऱ्या वर्षात पार्ट टाइम काम करणे सुरू केले होते. त्यातून मला अतिरिक्त उत्पन्न झाले. ज्याचा वापर मी फी भरण्यासाठी केला MBA पूर्ण झाल्यानंतर सॅलरीचा वापर अवनीने कर्ज फेडण्यासाठी केला. नशिबाने माझ्यावर कुठलीही जबाबदारी नव्हती. त्यामुळे शिक्षण पूर्ण होताच मी पगारातील मोठा भाग कर्ज फेडण्यासाठी वापरला. जर तुम्हीही कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असाल तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या छोट्या मोठ्या प्रयत्नातूनच एक मोठे यश मिळते असा सल्लाही अवनीने दिला आहे.
दरम्यान, बऱ्याच जणांना हा एक चांगला आर्थिक निर्णय वाटणार नाही, पण मला नोकरी सोडायची असल्यामुळे कर्जाचा त्रास नको होता असे अवनीने स्पष्ट सांगितले. तिच्यावर कोणीही अवलंबून नसल्यामुळे ती आपल्या कमाईचा मोठा भाग कर्ज लवकर फेडण्यासाठी वापरू शकली. या शिस्तबद्ध दृष्टिकोनामुळे तिला आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांच्या आत ३० लाख रुपयांचे कर्ज फेडण्यास मदत झाली.