महिलांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथून संतापजनक प्रकार समोर आला. भररस्त्यात एका तरुणाने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हा व्हिडीओ @MamtaTripathi80 या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला. व्हिडीओत दिसत आहे की, बुरखा घातलेली महिला रस्त्याने एकटी चालत असताना अचानक पाठीमागून आलेला एक तरुण तिला मिठी मारतो आणि चुकीच्या पद्धतीने तिच्या छातीलाही स्पर्श करतो. काही सेकंद हा तरुण या महिलेसोबत हे घाणेरडे कृत्य करतो. त्यानंतर महिला मागे वळून पाहूपर्यंत तो पळून जातो. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. दिवसाढवळ्या अशी घटना घडत असेल तर स्त्रियांनी घराबाहेर पडायचे की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, "दिवसाढवळ्या अशा गोष्टी घडत आहेत, तर महिला सुरक्षेची काय गॅरंटी आहे?" दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा करावी."